अहमदनगर : राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल केले. पंकजा मुंडे यांचं जलसंधारण आणि रोजगार हमी योजना हे खात या विस्तारामध्ये काढण्यात आलं.
यानंतर पंकजा मुंडेंनी थेट ट्विटरवरून नाराजीचा सूर आळवला. सिंगापूरमध्ये सोमवारी जल संधारण परिषद पार पडणार आहे. मात्र आता हे खातं आपल्याकडे नसल्याने तिथे जाणार नसल्याचे ट्विट पंकजा यांनी केले होते.
पंकजा यांच्या या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी रिप्लाय देत त्यांना कर्तव्याची जाणीव करुन दिलीये. जलसंधारण खात्याचे मंत्री जरी नसलात तरी वरिष्ठ मंत्री म्हणून या परिषदेला हजर राहू शकता अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पंकजा यांना फटकारलं.
हा वाद कमी का काय पाथर्डीमधल्या पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला आहे. यावेळी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीही केली. या आंदोलनामध्ये भाजयुमोचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. जलयुक्त शिवारचं श्रेय मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेंकडचं खातं काढल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.