औरंगाबाद : प्लास्टर ऑफ पँरिसच्या गणेशमूर्तीपासून दरवर्षी मोठं प्रदूषण होतय. त्याला आळा बसावा यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतोय. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे. औरंगाबादचा एक चिमुरडा गेल्या काही वर्षांपासून ही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय.
अवघ्या 12 वर्षांचा हा बाल मुर्तीकार सर्वेश वर्धावे. लहानपणापासूनच सर्वेशला बाप्पाचे वेड आहे. बाजारात अनेक सुंदर मूर्ती तो पाहायचा आणि त्यातूनच त्याला गणेशाच्या मूर्ती बनवण्याचा लळा लागला. शाळेत त्याला पर्यावरणाते महत्व आणि प्लास्टर ऑफ पँरिसच्या माध्यमातून होणा-या प्रदूषणाची माहिती झाली आणि त्याने ठरवले यापुढे आपणही मातीचाच बाप्पा बनवायचा आणि परिसरातील लोकांमध्ये सुद्धा याची जागृती करायची.
यातूनच त्याने बाप्पा घडवायला सुरुवात केली. शाडू मातीच्या मूर्ती साकारणारा सर्वेस यावेळेस तब्बल 8 फुटांची मूर्ती साकारतोय. ती सुद्धा कागदांच्या लगदयाची. वर्षभर त्याच्या घरी येणारे वर्तमानपत्र त्यानं साठवले. 500 किलो पेपरचा लगदे बनवले आणि त्यातून आता मोठा गणराया साकारण्याचा त्याचा प्रयत्न सुरु आहे.
गेल्या तीन वर्षांपासून तो बाप्पाच्या मातीच्या मूर्ती बनवतोय आणि त्याच्या कॉलनीतील लोकांना त्या मूर्ती विनामूल्य देतोय. पहिल्या वर्षी जमलं नाही मात्र आज या चिमुरड्याचे लिलया मातीवर हात फिरतात आणि साकारतो सुंदर बाप्पा.
मातीच्या मूर्तीसोबत तो घरी नैसर्गिक रंग सुद्धा तयार करतो. घरगुती रंगापासून रंगवलेले बाप्पा आता तयार झाले आहेत. विविध देवतांच्या आकाराचे तब्बल 30 बाप्पा त्यानं तयार केले आहे. फुटबॉल चँम्पियन असणारा बाप्पा सुद्धा त्याने यावेळेस साकारला आहे.
ठरवलं तर निर्सगात होणारं प्रदूषण आपण रोखू शकतो. गरज आहे ती निर्धार करण्याची. चिमुरडा सर्वेश जे करू शकतो ते आपण का नाही. चला तर ठरवूया यावर्षीचा गणेशोत्सव आपणही इको फ्रेंडलीच करूया.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.