अकोल्यात खाकी वर्दीतील गुंडगिरी

खाकी वर्दीतल्या गुंडगिरीचा पुन्हा प्रत्यय आलाय. अकोला जिल्ह्यात पोलिसांनी निरपराध गावकऱ्यांना मारहाण तर केलीये. शिवाय दुस-या एका घटनेत पोलीस अधिक्षकांनी 'झी मीडिया'च्या प्रतिनिधीला शिवीगाळ करत त्याचा कॅमेराही हिसकावून घेतला. 

Updated: Apr 22, 2015, 11:48 PM IST
अकोल्यात खाकी वर्दीतील गुंडगिरी title=

अकोला : खाकी वर्दीतल्या गुंडगिरीचा पुन्हा प्रत्यय आलाय. अकोला जिल्ह्यात पोलिसांनी निरपराध गावकऱ्यांना मारहाण तर केलीये. शिवाय दुस-या एका घटनेत पोलीस अधिक्षकांनी 'झी मीडिया'च्या प्रतिनिधीला शिवीगाळ करत त्याचा कॅमेराही हिसकावून घेतला. 

गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील अकोला जिल्ह्यातील आहेत. तिथलेच पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या दादागिरीचा आणि असभ्य वर्तनाचा प्रत्यय आलाय. अकोला शहरापासून १७ किलोमीटर अंतरावरच्या काप्शी तलाव गावात अक्षय्य तृतीयेनिमित्तं मोठा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार कारवाई करायला गेलेल्या पोलीस पथकाला, गावकऱ्यांनी विरोध केला. आणि इथेच पोलिसांची दंडेलशाही सुरु झाली. 

पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतलं. आणि गावात घुसून गावकऱ्यांना मारहाण केली. यातून वृद्ध, महिला, लहान मुलंही सुटली नाहीत. शिवाय घरांसह, वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. अकोला पोलिसांचा सामान्यांवरच्या गुंडगिरीचा प्रकार इथेच संपत नाही. आता अकोला पोलिसांच्या असेंवदनशिलतेचा अंत दिसून आला. अकोल्यातील दाबकी या गावी रात्री अपघात झाला. त्यानंतर जमावानं केलेल्या दगडफेकीची बातमी मिळवण्यासाठी, झी मीडियाचे प्रतिनिधी जयेश जगड घटनास्थळी गेले. तिथं त्यांचा कॅमेराच पोलीस अधीक्षक मीना यांनी हिसकाऊन घेतला. त्यांनी जगड यांना असभ्य भाषेत शिवीगाळ केली. 

जमावानं पोलिसांवर केलेल्या दगडफेकीचा राग पोलिसांनी अशाप्रकारे माध्यम प्रतिनिधीवर काढत, स्वतः अधीक्षकांनीच माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या कृतीचा लोकप्रतिनिधींनीही निषेध केलाय. 

सर्वसामान्यांना पोलिसांविषयी भिती न वाटता आधार वाटला पाहिजे. अन्यायग्रस्तांना पोलिसांकडून दिलासा मिळाला पाहिजे. अशा साध्या अपेक्षा जर पूर्ण होत नसतील तर गृहखात्यासाठी ही नक्कीच लाजीरवाणी गोष्ट आहे. आता वरीष्ठ पातळीवरुन या प्रकरणात किती वेगानं आणि किती परीणामकारक कारवाई होत ते पाहायचं. जोपर्यंत सामान्यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत झी मीडिया त्याचा पाठपुरावा करतच राहणार.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.