www.24taas.com, कोल्हापूर, अमरावती
राज्यातल्या महाविद्यालयीन प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकलाय. प्राध्यपकांच्या या आंदोलनामुळं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं तसंच अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठानं परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकल्यात.
सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ मिळावी, नेट-सेटबाधित प्राध्यापकांना नियुक्तीपासूनचे सर्व लाभ मिळावेत या सर्व प्रमुख मागण्यांसह राज्यातल्या प्राध्यापकांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकलाय. यात शिवाजी विद्यापीठाच्या दोन हजार प्राध्यापकांचा सहभाग आहे. २२ मार्चपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होत आहेत. मात्र, अद्याप अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार नाहीत. यामुळं विद्यापीठ प्रशासनाला परीक्षा पुढं ढकलाव्या लागल्यात. शिवाजी विद्यापीठाअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या एकूण २७९ कॉलेजमधले सव्वा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मात्र, परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरलीय.
दरम्यान, प्राध्यापकांच्या या असहकार आंदोलनाचा फटका संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही बसलाय. सहाव्या वेतन आयोगाची ८० टक्के थकबाकी द्यावी आणि १९९१ ते २००० दरम्यान नियुक्त झालेल्या प्राध्यापकांना नियुक्ती दिनापासून पगारवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी प्राध्यपकांनी हे असहाकार आंदोलन सुरु केलंय. त्यामुळे अमरावती विद्यपीठानंही परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतलाय. अकोला, यवतमाळ, बुलडाणा, आणि वाशिम जिल्ह्यातले ९५ हजार विद्यार्थी यंदा परीक्षा देणार होते मात्र, हेही विद्यार्थी आता हे आंदोलन संपण्याची वाट पाहत आहेत.