नागपूर : नागपुरचा गुणवान धावपटू आकाश उके याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे.
सिरसपेठ भागातल्या हजारेवाडी इथे राहणाऱ्या आकाश उकेनं विष पिऊन आत्महत्या केली. कोलकाता हाफ मॅरेथॉनमध्ये त्यानं अव्वल स्थान पटकावलं होतं.
रविवारी मध्यरात्री त्यानं विष घेतलं होतं. इतरांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीनं शासकीय मेडिकल महाविद्यालय आणि हॉस्पीटलायात दाखल केलं गेलं.
परंतु, आकाशवर उपचार सुरू असतानाच त्यानं अखेरचा श्वास घेतला. आकाश अवघ्या २५ वर्षांचा होता.
परंतु, आकाशनं आत्महत्या का केली? त्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आकाश हा नागपूरमधला प्रतिभावंत धावपटू म्हणून ओळखला जात होता. त्याने आजवर शहरातील विविध क्लबमध्ये सराव केले होता. काही महिन्यांपासून तो स्वतंत्रपणे सराव करायचा. क्रॉसकंट्री, हाफ-फुल मॅरेथॉन स्पध्रेत आकाशा पहिल्या ५ विजेत्यांमध्ये असायचा.
आकाशने प्रतिष्ठेच्या कोलकाता राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धात प्रथम येऊन सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता, तेव्हापासूनच आकाश अॅथलेटिक्समध्ये प्रामुख्याने प्रकाश झोतात आला. हा स्पर्धेत १५ किलोमीटर त्यानं केवळ ४० मिनिटं, ५३ सेकंदात पूर्ण केली होती. १.२० लाखांचं बक्षीस त्याला या स्पर्धेत मिळालं होतं.