अरूण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे : नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर आता जुन्या नोटा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक अकाऊंटचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
पुण्यातील फर्ग्सुसन कॉलेज कँपस मधील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये इथल्या होस्टेलच्या विद्यार्थ्यांची अकाऊंट्स आहेत. त्या अकाऊंट्सच्या माध्यमातून इथल्या एका शिपायानं त्याच्याकडील जुन्या नोटा मोठ्या प्रमाणावर बदलून घेतल्याची चर्चा आहे.
इथल्या ४०० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करत लाखो रुपये बदलले गेल्याची कुजबूज आहे... विद्यार्थी याविषयी उघडपणे काही बोलायला तयार नाहीत.
या पार्श्वभूमीवर हॉस्टेलमधील चारशे विद्यार्थ्यांची अकाऊंट्स तात्पुरत्या स्वरूपात गोठवण्यात आली आहेत.
या प्रकरणी कॉलेज व्यवस्थापनानं मात्र हा सगळा बँकेच्या कामाचा भाग असल्याचं सांगत हात झटकले आहेत...
सध्या काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग अनेक ठिकाणी सुरु आहेत. फर्ग्युसन कॉलेजनं हात वर केले असले तरी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात एवढे पैसे अचानक आले कुठून... ते नेमके कुणाचे आहेत ...या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे.