वाकसई, पुणे: प्रगतीपथावर असलेल्या पुरोगामीत्त्वाचा डंका पिटणाऱ्याा महाराष्ट्रात आजही हुंड्यासाठी बळी जातायेत. ही लाजीरवाणी बाब आहे. साखरपुडा झाल्यानंतर हुंड्यासाठी मुलीचं लग्न मोडल्यानं आलेल्या नैराश्यातून वधू पित्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोणावळ्याजवळील वाकसाई गावात ही घटना घडलीये. बाबूराव राघू येवले असं आत्महत्या केलेल्या वधू पित्याचं नाव आहे. येवले यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला हुंड्यासाठी मुलीचं लग्न मोडल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांनी शेतामध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणी मावळच्या नायगाव येथील नियोजित वर बाळू भागू लालगुडे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. ७ मे लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी मंगल कार्यालय ठरवण्यात आलं. साखरपुड्यानंतर सासरच्या मंडळींकडून १० तोळे सोनं आणि मोटारीची मागणी झाली.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं येवले यांनी हुंडा देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर लालगुडे परिवारानं लग्न मोडल्याचं सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.