ठाणे : ठाण्यात काही रिक्षावाल्यांकडून अजूनही महिला सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण दोन मुलींनी स्व:तला वाचवण्यासाठी रिक्षातून उडी मारली आहे. या प्रकरणात या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या या मुली अभाविपच्या कार्यक्रमासाठी ठाण्यात आल्या होत्या. नौपाडा भागात आल्यानंतर या मुली भिवंडी येथील आपल्या नातेवाईकांकडे रिक्षातून परत जात होत्या, तेव्हा रिक्षात बसल्यावर, रिक्षा चालक मुलींकडे पाहून अश्लील हावभाव करत होत्या, या प्रकारामुळे मुली प्रचंड घाबरल्या.
अखेर हा प्रकार लक्षात येताच दोनही मुलींनी रिक्षावाल्याला रिक्षा थांबण्याची विनंती केली, पण रिक्षावाल्याने त्यांचं म्हणणं ऐकून न घेता, रिक्षाचा वेग वाढवला.
घाबरलेल्या दोनही मुलींनी आपला जीव वाचवण्यासाठी कॅडबरी पुलाजवळ रिक्षातून उडी मारली. यात दोनही मुली जखमी झाल्या.
यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला हा प्रकार लक्षात आला, या महिलेने या दोनही मुलींना उपचारासाठी तात्काळ ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलं.
आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पोलिस पथक बनवली आहेत, आरोपीचे स्केच बनवली जातील, नाकाबंदी रात्रीपासूनच सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
या प्रकरणातील आरोपी रिक्षावाला अद्यापही फरार असतानाच, ठाण्यात अपहरणाच्या प्रयत्नाची दुसरी घटना घडल्याने ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
ठाण्यात यापूर्वी स्वप्नाली लाड या मुलीनेही रिक्षावाल्यापासून जीव वाचवण्यासाठी रिक्षातून उडी मारली होती. यात स्वप्नाली गंभीर जखमी झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.