www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावलीय. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून यात चौघांचा बळी गेलाय तर ७५ हजार हेक्टरवरील पिकाचं या पावसामुळं नुकसान झालंय.
चंद्रपूर
चंद्रपुरात पावसानं धुमाकूळ घातलाय. अतिवृष्टीमुळे हजारो घरं पाण्याखाली गेलीत तर कित्येक घरांची पडझड झालीय. चंद्रपूर ताडोबा मार्गावरचा महत्त्वाचा पूल खचल्यानं ताडोबा मार्ग बंद झालाय. त्यामुळं पावसाचा फटका ताडोबातल्या पर्यटकांनाही बसलाय.
चंद्रपूर शहर आधीच पुराने बाधित होते. त्यातच शुक्रवारी आलेल्या चार तासांच्या ढगफुटीसदृश्यं पावसानं शहर जलमय झालं. शहर आणि जिल्ह्यात हजारो घरांची पडझड झाली. जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे दावे फोल ठरल्याचे चित्र आहे. हजारो नागरिक मदतीच्या आशेत आहेत. दरम्यान ‘वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड’च्या चुकीच्या नियोजनाने ताडोबा रस्त्यावरील वाहून गेलेल्या पुलाची डागडुजी केली जात आहे.
नागपूर
चंद्रपुरातच नाहीतर विदर्भातही वरुणराजा चांगलाच बरसतोय. नागपुरात शुक्रवारी संध्याकाळपासून मुसळधार पास सुरु आहे.
अकोला, यवतमाळ
अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. अकोल्यातल्या वाण धरणाचे चार तर यवतमाळमधल्या अरुणावती धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आलेत. वैनगंगा, इरई नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी वस्त्यांमध्ये शिरलंय. अंबाझरी तलाव भरुन वाहू लागला असून अप्पर वैतरणा धरणाचे अर्धा फुटाने उघडलेत.
वर्धा
वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय. मुंबई-नागपूर, नागपूर-हैदराबाद रेल्वेसेवा विस्कळीत झालीय.
अमरावती
अमरावतीमध्येही धो धो पावसामुळं अप्पर वर्धा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेत.
कोल्हापूर
विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही गेल्या २४ तासांत मुसळधार पावसानं थैमान घातलंय. जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचल्यानं कोल्हापूरकरांना पाण्यातून वाट काढत जावं लागतंय. या पावसामुळं कोल्हापुरातल्या जलाशयात वाढ झालीय. राधानगरी, वारणा धरण जवळपास भरलं असून पंचगंगा नदीसह सर्वच नद्या दुथडी भरुन वाहतायत.
सांगली
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे चांदोली धरण ८३ टक्के भरलंय. धरणाचे दरवाजे उघडले असल्याने वारणेच्या पाणीपातळीत वाढ झालीय. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
नाशिक
नाशिक शहरासह जिल्हाभर सुरु असणारा पाऊस नाशिकारांसाठी गुड न्यूज घेऊन आलाय. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झालाय. दारणा धरण ७५ टक्के भरलं असून पाण्याचा विसर्ग केला जातोय. मध्यम प्रकल्प असणार भावली धरण १०० टक्के भरलय. मात्र १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट क्षमता असणा-या गिरणा धरण क्षेत्राला आजही पावसाची प्रतीक्षा आहे. धरणात केवळ मृतसाठा उपलब्ध आहे. नाशिकच्या २३ धरणांत सरासरी २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट पाउस पडला असून सरासरी ४६ टक्के पर्जन्यवृष्टी झालीय.
येत्या काही तासांत महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळं नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे...