आरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!

बदलापूर येथील आरटीआय कार्यकर्ते अरूण सावंत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना कायमचं अपंगत्व आलंय. या घटनेची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत अरूण सावंत यांना १० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत. आरटीआय कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा आहे. 

Updated: Sep 5, 2015, 01:40 PM IST
आरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश! title=

बदलापूर : बदलापूर येथील आरटीआय कार्यकर्ते अरूण सावंत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना कायमचं अपंगत्व आलंय. या घटनेची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत अरूण सावंत यांना १० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत. आरटीआय कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा आहे. 

कुळगाव बदलापूरातले आरटीआय कार्यकर्ते अरूण सावंत यांच्यावर नगरपरिषद कार्यालयासमोरच २०१० मध्ये गोळीबार झाला होता. नगररचनाकारासोबत झालेल्या वादात हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला. त्या हल्ल्यात अरूण सावंत थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्या मणक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना कायमचं अपंगत्व आलंय.

हल्ला होण्याआधी १५ दिवस त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, तत्कालीन पोलीस आयुक्तांनी ही मागणी मान्य करूनही स्थानिक पातळीवर पोलीस संरक्षण मिळालं नाही. संरक्षण न दिल्यानेच हल्ला होऊन आपण कायमचं अपंग झाल्यामुळे आपल्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अरूण सावंत यांनी मानवी हक्क आयोगाकडे केली. 

आयोगाने सावंत यांच्या बाजूने निकाल देत ४आठवड्यांच्या आत सावंत यांना १० लाख रूपये नुकसान भरपाई द्यावेत असे आदेश राज्य सरकारला दिलेत. 

एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका असल्यास आधी त्याला पोलीस संरक्षण मिळावं त्यानंतरच तक्रारीची शहानिशा करावी असा आदेशही आयोगाने दिलाय. नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याच्या कानपिचक्याही आयोगाने सरकारला दिल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.