सावंतवाडी नगरपरिषदेत चुरस, दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे खरी लढत

सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. काँग्रेसलाही हा सामना महत्वाचा ठरणार आहे. कारण नारायण राणे यांना सावंतवाडी यावेळी तरी स्वीकारणार का याच उत्तर या निवडणुकीत मिळणार आहे.

Updated: Nov 18, 2016, 10:00 PM IST
सावंतवाडी नगरपरिषदेत चुरस, दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे खरी लढत title=

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. दीपक केसरकर यांनी मागच्या निवडणुकीत आमदार असताना 17 - 0 असा विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळी मंत्री असताना केसरकर काय करीष्मा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसलाही हा सामना महत्वाचा ठरणार आहे. कारण नारायण राणे यांना सावंतवाडी यावेळी तरी स्वीकारणार का याच उत्तर या निवडणुकीत मिळणार आहे.

- सावंतवाडीत केसरकरांची प्रतिष्ठा पणाला ?
- केसरकर 18-0 ची मॅजिक फिगर गाठणार ?
- केसरकर-चव्हाणांमध्ये कुणाची बाजी?
- राणेंना सावंतवाडी स्वीकारणार का ?

सावंतवाडी शहर दीपक केसरकर यांच्या पाठिशी खंबीर पणे उभं राहिल्याचं चित्र अलीकडच्या सर्वच निवडणुकीत दिसून आलंय. केसरकरांनी पक्ष बदल करून निवडणूक लढवली तरीही सावंतवाडीच्या मतदारांनी दीपक भाईंच्याच पारड्यात मत टाकली. मात्र हा सगळा झाला इतिहास. आता सावंतवाडीत बरंच पाणी पुलाखालून गेलंय. 

निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलेली बंडखोरी माजी नगराध्यक्ष राजन पोकळे आणि बबन साळगावकर यांनी थेट केसरकरांनाच दिलेलं आव्हान या सर्व गोष्टी आता विरल्या असल्या तरी यानिमित्तानं दुरावलेली मनं कितपत जुळतात यावरच यशापयशाचं गणित ठरणारेय. केसरकर यांच्या दृष्टीनं विजय नव्हे तर यावेळी 18 झिरोची मॅजिक फिगरच महत्वपूर्ण ठरणार आहे. एक जागा गमावली तरी त्यांचा तो नैतिक पराभव मानला जाऊ शकतो. 

सावंतवाडीत शिवसेना-भाजप समोरासमोर लढतायत. युती न झाल्याचा ठपका भाजप केसरकर यांच्यावर फोडत आहे. केसरकर आणि भाजप हे दोन्ही पक्ष यानिमित्तानं आगामी विधानसभेची बेगमी करताहेत हेच यानिमित्तानं समोर येत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी मध्ये आघाडी झालीय. काँग्रेस याठिकाणी 14 तर राष्ट्रवादी 3 जागा लढवतायत. मात्र जसा बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसला तसा तो काँग्रेसलाही बसलाय. 

सावंतवाडीची यावेळची निवडणूक दीपक केसरकर यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. राज्यमंत्री असलेले दीपक केसरकर यांच्या पाडावासाठी भाजपसह सर्वच पक्ष एकवटलेत. साहजिकच राज्याच लक्ष या निवडणुकीवर आहे.