५९ वर्षानंतर महाराष्ट्राला सापडला १०७ वा 'हुतात्मा'

होय, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईनंतर तब्बल ५९ वर्षांनी राज्याला १०७ वा हुतात्मा सापडलाय. शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची 'हुतात्मा' म्हणून नोंद करण्यात आलीय. तोरस्कर कुटुंबीयांचा यासाठी दिलेला लढा अखेर यशस्वी झालाय. 

Updated: Jan 22, 2016, 09:30 AM IST
५९ वर्षानंतर महाराष्ट्राला सापडला १०७ वा 'हुतात्मा' title=

कोल्हापूर : होय, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईनंतर तब्बल ५९ वर्षांनी राज्याला १०७ वा हुतात्मा सापडलाय. शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची 'हुतात्मा' म्हणून नोंद करण्यात आलीय. तोरस्कर कुटुंबीयांचा यासाठी दिलेला लढा अखेर यशस्वी झालाय. 

राज्य शासनाने २०११ साली महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या चळवळीतील हुतात्म्यांची यादी जाहीर केली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शंकरराव तोरस्कर यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांकडे अर्ज-विनंत्या व पुरावे सादर केले. त्यांच्या कष्टाला यश आले. १३ जानेवारी २०१६ रोजी राज्य शासनाने अखेर शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची हुतात्मा म्हणून नोंद केल्याची माहिती नातू संजय तोरस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शंकरराव तोरस्कर हे पहिले बलिदान देणारे पश्चिम महाराष्ट्रातील ते एकमेव शिलेदार होते. १८ जानेवारी १९५६ रोजी बिंदू चौक येथे झालेल्या सभेत शंकरराव पोलिसांच्या गोळीने, बंदुकीच्या संगिनीने जखमी झाले. यानंतर त्यांचा सात दिवसांनी मृत्यू झाला. 

आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूनंतर ५० वर्षांनी त्यांच्या मृत्यूचे पुरावे गोळा करणं हे काम तोरस्करांच्या कुटुंबीयांना करावं लागलं. यासाठी, चळवळीत सहभागी झालेले ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी आमदार बाबूराव धारवाडे, पैलवान नारायण जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले जबाबही नोंदविले.

अखंड पाठपुराव्यानंतर अखेर शासनाने १०७वे हुतात्मा म्हणून असाधारण राजपत्रात त्यांची नोंद घेतली. याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाकडून १३ जानेवारीला तोरस्कर कुटुंबियांना नुकतंच मिळालंय.