नागपूर : मिठाई किंवा ड्रायफ्रुट्स खाताना जरा सावधान. कारण तुमच्या मिठाईत वापरलेले किंवा ड्रायफ्रूट्स म्हणून तुम्ही विकत घेतलेल्या पिस्त्यांमध्ये भेसळ असू शकते. पिस्ता म्हणून तूमच्या माथी चक्क शेंगदाणे मारले जात आहे.. नागपूरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...
थोडक्या गुंतवणुकीत जास्तीत-जास्त नफा कमावण्याच्या लालसेपोटी मिठाई निर्माते पिस्त्याच्याऐवजी शेंगदाणे वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आलाय. FDA नं शहरातील मिठाई निर्मात्यांच्या कारखान्यावर घातलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला आहे. शेंगदाण्यावर प्रक्रिया करून, त्यांना रंग देऊन पिस्ता म्हणून त्यांची विक्री केली जातीये.
रंग दिल्यावर शेंगदाणा आणि पिस्त्यामधील फरक ओळखणं अशक्य असल्यानं मिठाई विक्रेते याचा फायदा घेत आहेत.. सोनपापडी या मिठाईत अशा बोगस पिस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. बाजारात पिस्ता 800 रुपये किलो दराने मिळतो तर शेंगदाणे 80 रुपये किलो दरानं. त्यामुळे व्यापारी या गोरख धंद्यातून भरपूर कमाई करताहेत..
शेंगदाण्याला दिलेला रंग हा मानवी शरीराकरता घातक नसला तरीही याच्या वापराची परवानगी मात्र कायद्यात नाही. FDA नं कारवाई करून हा सर्व साठा जप्त केलाय. ग्राहकांची लूट करणा-या अशा दुकानदारांवर कठोर कारवाईची मागणी नागपूरकरांनी केलीये.
गेल्या काही दिवसापासून हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरु असून FDA च्या कारवाईने आता या गैर प्रकारावर आळा बसण्याची अपेक्षा आहे.