शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी, भाजपचं स्वप्न भंगलं

राज्यातील ग्रामीण भागात भाजपचा विस्तार रोखण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केलीय.

Updated: Mar 20, 2017, 08:03 PM IST
शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी, भाजपचं स्वप्न भंगलं title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात भाजपचा विस्तार रोखण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केलीय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या खेळीमुळं राज्यातील आठ जिल्हा परिषदांमध्ये भाजपला फटका बसणार आहे.

सर्वात मोठा पक्ष असूनही तिथं भाजप सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. जालना, औरंगाबाद, हिंगोली, सांगली, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ या ठिकाणी शिवसेनेनं युती केली असती तर भाजपला सत्ता स्थापन करणं सहज शक्य झालं असतं. मात्र या ठिकाणी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ दिलीय. यापैकी केवळ जालनामध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषध अध्यक्ष होणाराय. तर इतर ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याचं समाधान शिवसेनेला मिळणाराय.

शिवसेनेच्या या खेळीमुळे भाजपला आता केवळ वर्धा, लातूर, चंद्रपूर, जळगाव आणि गडचिरोली या ठिकाणीच सत्ता स्थापन करणं शक्य होणार आहे. तर बीडसह काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एखादा गट फोडून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत.