नाशिकमध्ये मनसेला जोरदार धक्का

नाशिक महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेला जोरदार धक्का बसला. थेट माजी महापौरांनीच पक्षादेश धुडकावून लावला. एकीकडं पक्षांतर्गत नाराजी दूर करून संघटना वाढवणं आणि दुसरीकडं विकासकामंही करायची, अशा दिव्यांचा सामना मनसेला करावा लागणाराय...

Updated: Apr 10, 2015, 09:30 PM IST
नाशिकमध्ये मनसेला जोरदार धक्का  title=

नाशिक : नाशिक महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेला जोरदार धक्का बसला. थेट माजी महापौरांनीच पक्षादेश धुडकावून लावला. एकीकडं पक्षांतर्गत नाराजी दूर करून संघटना वाढवणं आणि दुसरीकडं विकासकामंही करायची, अशा दिव्यांचा सामना मनसेला करावा लागणाराय...

नाशिकच्या बालेकिल्ल्यात मनसेचं काही खरं नाही... नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत, मनसेच्या माजी महापौरांनीच पक्षादेश धुडकावून लावला. माजी प्रभाग समिती सभापतींनीही याकामी त्यांना साथ दिली. महापौरपदाच्या निवडणुकीआधी दोघा नगरसेवकांनी मनसेच्या इंजिनाचा ‘ट्रॅक’ सोडून शिवसेनेची साथ धरलीय. तर आणखी एका नगरसेवकानं भाजपशी जवळीक साधलीय. तीन वर्षांपूर्वी ४० नगरसेवक असणाऱ्या मनसेचं संख्याबळ ३६ वर आलं असून आणखी फाटाफूट होण्याच्या चर्चेला उधाण आलंय. अशा परिस्थितीत मनसेची तटबंदी भक्कम करून, संघटना वाढवण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंच्या शिलेदारांसमोर आहे.

महापालिकेतल्या या सगळ्या घडामोडींमागे माजी आमदार वसंत गिते आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही. नवनिर्वाचित पश्चिम प्रभाग समिती सभापतींनी तर आपण भाजपचे प्राथमिक सदस्य झाल्याचं घोषित केलंय. या इनकमिंगमुळं भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. 

महापालिका निवडणुकांसाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी उरलाय. मात्र पुन्हा संधी मिळण्याची शाश्वती नसल्यानं नगरसेवकांची बंडखोरी सुरू झालीय. राजगडावरून त्याची कशी दखल घेतली जाते, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.