अलिबाग : राज्यात तंबाखू हा विषय सध्या तंबाखूपेक्षाही जास्त चघळला जातोय . त्याचवेळी रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातील विद्यार्थी तंबाखूमुक्तिसाठी लढा देताहेत.
देशात १४.६ टक्के मुलं तंबाखूच्या आहारी आहेत. दररोज ५,५०० मुलांना व्यसन लागते. तर ३६.९ टक्के मुले दहाव्या वर्षांपासून तंबाखू खातात. दरवर्षी अडीच लाख लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतो.
ही भयावह आकडेवारी जागतिक सर्वेक्षणातून पुढे आली आहे. नवीन पिढी तंबाखूच्या या जीवघेण्या सवयीपासून दूर रहावी यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या सहकार्याने तंबाखूमुक्त शाळा अभियान राज्यात राबविवले जात आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात हे अभियान १०० टक्के यशस्वी झाले आहे.
या अभियानांतर्गत छोट्या विद्यार्थ्यांनी गावागावात प्रचारफेर्या काढल्या. नाटुकली, पथनाट्यांच्या माध्यमातून तंबाखूचे दुष्परिणाम ग्रामस्थांना समजावून सांगितले.वेगवेळ्या स्पर्धा, हस्तकला यामध्येही तंबाखूमुक्तिचा प्रभाव पाहायला मिळतो. या अभियानामुळे अनेक गावातील महिलांनी तंबाखूची मशेरी लावणे सोडून दिले. पुरूषमंडळीही या व्यसनापासून दूर राहू लागली आहे.
काही गावांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास निर्बंध आणण्यात आले आहेत. शळांच्या परिसरात तंबाखू विकायला बंदी घालण्यात आली असून त्यावर विद्यार्थी स्वतः लक्ष ठेवून आहेत. म्हसळा तालुक्यातील १३७ प्राथमिक शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. सलाम मुंबई फाऊंडेशनने नुकत्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार म्हसळा तालुका या अभियानात राज्यात अव्वल ठरला आहे.
राज्यात सध्या तंबाखू या विषयावर राजकीय वादळ उठले आहे. त्याचवेळी म्हसळ्यासारख्या दुर्गम तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेली ही मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींनी यातून काहीतरी धडा घेतील का?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.