अकोला : (जयेश जगड, झी मीडिया) दुष्काळ आणखी किती जणांचा जीव घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी एकीकडे आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांची मुलंही जीवनयात्रा संपवतायत.
राज्यातल्या दुष्काळाचं रुप किती भयावह आणि भेसूर आहे याचा दाहक अनुभव अकोल्यातल्या दधम गावात आला. दिवाळीला नवा ड्रेस, शाळेचा गणवेश आणि काही पुस्तकं मिळाली नाहीत, म्हणून एका हताश विद्यार्थ्यानं चक्क आत्महत्या केली.
विशाल खुळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. अकोल्याच्या महाराणा प्रताप महाविद्यालयाचा नववीत शिकणारा तो हुशार आणि चुणचुणीत विद्यार्थी. पण दुष्काळानं त्याच्या स्वप्नांची आणि आयुष्याचीच राख झालीय.
विशालच्या वडिलांकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. पण गेल्या वर्षीपासून नापिकीच्या दुष्टचक्रात हे कुटुंब सापडलंय. विशालच्या वडिलांवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं ४० हजारांचं कर्ज आहे. नापिकीमुळे त्यांना ते फेडता आलेलं नाही. त्यातच विशालच्या आत्महत्येनं खुळे कुटुंबीय पार हादरुन गेलंय.
काही दिवसांपूर्वीच लातूरच्या स्वाती पिठले या विद्यार्थिनीनं पासचे पैसे नसल्यानं आत्महत्या केली होती. आता अकोल्याच्या विशालनंही गणवेषासाठी आत्महत्येचं पाऊल उचललं.
एकीकडे सरकार दुष्काळग्रस्तांसाठी मोठमोठ्या घोषणा करतंय. पण सरकारी यंत्रणेला शेतक-यांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करता आलेली नाही, हेच वास्तव यातून स्पष्ट होतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.