योगेश खरे, नाशिक : सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचा इशारा राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळेंनी दिलाय. सुप्रिया सुळेंनी अचानक एवढा आक्रमक पवित्रा घेण्याचं कारण काय? राष्ट्रवादीची सूत्रं लवकरच त्यांच्याकडं सोपवली जाणार आहेत का?
भाजपची घोडदौड रोखण्यासाठी स्वच्छ प्रतिमेच्या प्रियांका गांधींना काँग्रेस निवडणुकीच्या रणमैदानात उतरवणार, अशी चर्चा आपण नेहमीच ऐकतो... पण आता महाराष्ट्रातही अशीच चर्चा सुरू झालीय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आत्तापर्यंत मवाळ वाटणाऱ्या सुप्रिया सुळे गेल्या काही दिवसांत अचानक आक्रमक झाल्यात. केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागण्यात ही पवारकन्या आघाडीवर आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणी दोन दिवसांत आरोपपत्र दाखल झाले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देऊन सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय.
नाशिकचे प्रभारी जितेंद्र आव्हाड यांच्या अनुपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीची बैठक घेतली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं मोर्चेबांधणी केली. कांद्यावरून सरकारला घेरण्यासाठी सटाणा तालुक्यात कांदा परिषद घेतली. स्मार्ट सिटी योजनेवर टीका करताना, न खाता हूँ, ना खाने देता हूँ या मोदींच्या घोषणेची त्यांनी खिल्ली उडवली.
राष्ट्रवादीचे अनेक नेते या ना त्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकले आहेत. माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार रमेश कदम असे नेते तर तुरूंगवासात आहेत. त्यामुळंच राजकारणात स्वच्छ प्रतिमा असलेल्या सुप्रिया सुळेंची आक्रमकता बरंच काही बोलून जातेय. कोपर्डी प्रकरणी रस्त्यावर उतरण्याचा त्यांचा इशारा म्हणजे भविष्यातील बदलांची नांदीच मानली जाते. सुप्रिया सुळेंचं हे महिला नेतृत्व राष्ट्रवादीला तारू शकेल का? याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.