ठाणे : चालत्या रिक्षातून उडी मारल्यानंतर कोमात गेलेली स्वप्नाली लाड ही तरुणी तब्बल 21 दिवसांनंतर शुद्धीवर आलीय. अपघातानंतर ती कोमात होती. अद्यापही, स्वप्नालीवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
स्वप्नाली हिला आयसीयूमधून हलवून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. स्वप्नाली अजून पूर्णत: बरी झाली नसली तरी तिची प्रकृती आता सुधारतेय. तिला सध्या व्हेंटिलेटरचीही आवश्यकता नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. उपचारादरम्यान स्वप्नालीवर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.
स्वप्नाली हालचाल करत असली तरी ती अजूनही कुणालाही ओळखू शकत नाही... पण, स्वप्नाली शुद्धीत आलीय, याचा आनंदही तिच्या कुटुंबासाठी कमी नाही. त्यासोबतच, स्वप्नालीचा प्रकृतीत झालेल्या सुधारणेमुळे पोलिसांनाही या प्रकरणात मदतच होणार आहे.
काय घडलं होतं ‘त्या’ दिवशी...
कापूरबावडी इथून घरी जाण्यासाठी स्वप्नाली लाड एका रिक्षात बसली होती. मात्र रिक्षावाला चुकीच्या दिशेने नेत असल्याचं पाहून तिनं आरडाओरडा केला. मात्र, तो थांबत नसल्याचं पाहून स्वप्नालीनं चालत्या रिक्षातून उडी मारली. धावत्या रिक्षातून उडी मारल्यानं तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि ती कोमात गेली होती. यावेळी, त्याच मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थानिक नगरसेविका उषा भोईर यांनी स्वप्नालीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. 'तो' रिक्षावाला कोण होता याचा शोध अद्यापही पोलीस घेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.