ठाणे : राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचं चित्र आहे. मुंबई वगळता सर्वच महत्त्वाच्या शहरात पाऱ्याने चाळीशीचा पल्ला गाठल्याचं दिसून येतंय. पुणे नाशिक नागपूरमध्ये पाऱ्याने चाळीशी गाठलीय. तर ठाण्यातही तापमान 39 अंशांवर पोहोचलं.
विशेष म्हणजे ठाण्याजवळ कल्याण डोंबिवली परिसरातही पाऱ्याने कधी नाही ती चाळीशी पार केलीय. वाढलेल्या तापमानासह आर्द्रतेत कमालीची घट झाल्याने उन्हाचे अक्षरशः चटके बसत आहेत. त्यामुळे गुजरात आणि राजस्थानातून वाहात असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात तापमानात प्रचंड वाढ झालीय.
पुढचे दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यावर्षीचा उन्हाळा नेहमीपेक्षा दीड ते दोन अंशांनी जास्तच असेल असा अंदाज याआधीच हवामान खात्याने वर्तवला होता. त्याची लक्षणं मार्च महिना संपायच्या आधीच दिसायला लागली आहेत.