ठाणे महापालिकेत तिजोरीच्या चाव्यासाठी सेनेची कसरत...

ठाणे पालिकेवर शिवसेनेची बहुमताने सत्ता आली असली तरीही पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी बहुमत असल्यानंतर ही शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

Updated: Mar 15, 2017, 08:45 PM IST
ठाणे महापालिकेत तिजोरीच्या चाव्यासाठी सेनेची कसरत... title=

ठाणे : ठाणे पालिकेवर शिवसेनेची बहुमताने सत्ता आली असली तरीही पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी बहुमत असल्यानंतर ही शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

भाजपाची भूमिका तटस्थ राहणार असल्याने शिवसेनेला मात्र अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे अपक्षांचेही चांगभले होणार आहे. 

ठाणे पालिकेत सध्याचे संख्याबळ

ठाणे पालिकेत सध्याचे संख्याबळ शिवसेना ६७, राष्ट्रवादी ३४, भाजप २३ काँग्रेस ३, आणि एमआयएम २, आणि अपक्ष २ असे संख्याबळ असल्याने स्थायी समितीच्या निवडणुकीत १६ सदस्यांची निवड करण्यात येते. या निवडीत पक्षीय संख्याबळाचा आधार असतो.

 स्थायी समितीच्या सदस्यांची निवड

 स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे ८, राष्ट्रवादीचे ४, भाजपचे २, काँग्रेसचा १, असे १५ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. तर शिवसेनेला एका अतिरिक्त सदस्यांची आवशक्यता असल्याने पक्षीय संख्याबळात वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला आता पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या खिशात ठेवण्यासाठी आता एमआयएम आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार, त्यामुळे स्थायी समितीत शिवसेनेचे संख्याबळ ९ होईल आणि स्थायी समिती सभापती हा शिवसेनेचाच बसेल अशी शक्यता आहे. 
 
 दरम्यान चार पक्षांपैकी कळवा विटावा येथील राष्ट्रवादी पुरस्कृत विजयी उमेदवार जितेंद्र पाटील हा राष्ट्रवादीच्या गोटात आहे. त्यामुळे शिवसेनेकडे आता मदतीचा हात देणारे दोन नगरसेवक एमआयएमचे आणि एक विश्वनाथ भगत या अपक्षांचा समावेश राहणार आहे. शिवसेनेची सत्ता असताना स्थायी समितीच्या तिजोरीची चावी घेण्यासाठी आता या अपक्षांचा घोडेबाजार वधारणार आहे. यामध्ये एमआयएम नगरसेवकांना अभिवचन देत शिवसेना पाठिंबा मिळवेल यात शंका नाही. 
 
 ठाणे पालिकेवर महापौर शिवसेनेने बसविल्यानंतर आता स्थायी समिती ही  महत्वाची निवड प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 
  
याबाबत भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले याना स्थायी समिती निवडीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले आम्ही मुंबई पालिकेप्रमाणेच ठाण्यात ही भूमिका बजावणार आहोत. दरम्यान पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी जो आदेश करतील त्याचे पालन करण्यात येणार असल्याची तटस्थ भूमिका स्पष्ट केली.