नवी मुंबई : लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या प्रियकराला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.प्रेयसी जीवंत असल्याचे भासवण्यासाठी आरोपीने विविध क्लुप्त्या केल्या, मात्र पोलिसांसमोर त्याचं बिंग फुटलं. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली.
सात महिन्यापूर्वी झालेल्या हत्येचा गुन्हा पोलिसांनी उघड केला आहे. ज्या महिलेची हत्या झालेली त्याच महिलेची कथित अपहरण प्रकरणात घाटकोपर पोलिसांनी त्याला अटक केली होती . मात्र `दृश्यम` चित्रपटातून प्रेरणा घेतलेल्या या आरोपीने महिलेच्या हत्येबाबत पोलीसांनी आधारात ठेवले होते .
कल्याण - शीळफाटा मार्गावर महापे येथे २२ जून २०१५ ला एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मयत महिलेची ओळख पटली नव्हती. या प्रकरणी तुर्भे एम आय डी सी पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता . परंतु घाटकोपर येथे एका महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. याचा तपास करता घाटकोपर येथे बेपत्ता झालेली महिला ही सुनीता अहिरे ही असल्याचे पटले आणि पोलिसांनी तिच्या अपहरण प्रकरणी संशयित म्हणून विकास म्हात्रे याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे हुशारीने तपास केल्यानंतर हत्येचे गूढ उकलले.
अंधेरी येथे राहणारा विकास म्हात्रे याचा दिवा येथे विकास म्हात्रेचा प्लास्टिक वायर्सचा कारखाना आहे. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या सुनीता अहिरे सोबत त्यांचे विवाहबाह्य संबध होते . या प्रेम संबधातून कायमचे सोबत राहण्याचे तगादा सुनीताने लावला होता. म्हात्रेला ते मान्य नव्हते तरी ती जून २०१५ रोजी त्याच्याकडे रहावयास आली . यावरून झालेल्या भांडणात म्हात्रेने सुनीताची हत्या केली आणी तिचा मृतदेह ड्रममध्ये भरून ठेवला. यात सिमेंट टाकून ठेवले. १४ दिवसानंतर त्याने तिचा मृतदेह ड्रमसह शीळ फाटा रोड येथे टाकून दिला.
मृत सुनीता जीवंत असून तिच्या शोधात पोलिसांना गुंतवण्याचा पुरेपूर प्रयत्न म्हात्रेने केला. याकरिता स्वतःचा मोबाईल घरी ठेऊन सुनीताचा मोबाईल घेऊन तो अनेक दिवस सातारा , कराड, आणि शिर्डी परिसरात फिरत होता. यामुळे सुनीता मयत असताना ती जीवंत असून या ठिकाणी फिरत असल्याची खोटी माहिती पोलिसांना देत राहिला.
दरम्यान, याआधी कोपरखैरणे येथील नाल्यामध्ये मृत आढळलेल्या किस्मत गुदडावत (२५) हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्याच प्रियकराला अटक केली होती. ठरलेले लग्न मोडल्यानंतरही दोघांमधील प्रेमसंबंध पंचायतीसमोर उघड करण्याची भीती दिल्याने प्रियकराने तिची हत्या केली होती. दंगलसिंग कर्मावत (२९) असे एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. दंगलसिंह हा मूळचा मध्य प्रदेशचा राहणारा आहे.