कळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक

पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रात आजही बालविवाहासारखी वाईट प्रथा सुरूच आहे... ठाण्यानजीकच्या कळवा भागात अशी एक घटना उजेडात आली. सुदैव एवढंच की, पोलिसांनी लग्नाच्या मांडवातच नवरदेव, वरपिता, वधूपिता, लग्न लावणारा भटजी यांच्या मुसक्या आवळल्या. आणि बालविवाहाचा हा कट उधळून लावला. 

Updated: Dec 4, 2014, 11:37 AM IST
कळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक title=
संग्रहीत

ठाणे : पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रात आजही बालविवाहासारखी वाईट प्रथा सुरूच आहे... ठाण्यानजीकच्या कळवा भागात अशी एक घटना उजेडात आली. सुदैव एवढंच की, पोलिसांनी लग्नाच्या मांडवातच नवरदेव, वरपिता, वधूपिता, लग्न लावणारा भटजी यांच्या मुसक्या आवळल्या. आणि बालविवाहाचा हा कट उधळून लावला.

कळवा परिसरातील सायबा नगर परिसरात राहणारी १६ वर्षांची मुलगी. घरात अठरा विश्व दारिद्र्य. त्यात वडील अट्टल दारूडे. चांगलं शिकून सवरून शिक्षिका बनण्याचं या मुलीचं स्वप्न होतं. शिक्षिका बनून गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची तिची महत्त्वाकांक्षा होती. पण तिच्या या स्वप्नांच्या आड आले ते तिचे जन्मदाते वडील.

दहावीत शिकणा-या या मुलीचा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्मही तिच्या वडिलांनी भरू दिला नाही. उलट तिच्यापेक्षा तब्बल बारा वर्षांनी मोठ्या असणा-या पवित्र उर्फ राजू सुदर्शन महंती या २८ वर्षीय तरूणाबरोबर तिचं लग्न ठरवून दिलं. गोविंद त्रिपाठी या कुर्ला येथे राहणाऱ्या भटजीला विवाह लावण्यासाठी ते कळव्याला घेऊन आले. कळव्याच्या सायबा नगर येथील शिवमंदिरात बुधवारी दुपारी या दोघांचा विवाह लावण्यात येणार होता.

मुलीचे आणि मुलाचे वडीलही यावेळी उपस्थित होते. मात्र या बालविवाहाची कुणकुण ठाणे पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन विभागाला मिळाली. विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी त्यांच्या पथकासह लग्नाचे विधी सुरु असतानाच छापा टाकला आणि हा बालविवाहाचा कट उधळून लावला. पोलसांनी नवरदेव पवित्र महंती, त्याचे वडील सुदर्शन महंती, भटजी गोविंद त्रिपाठी आणि मुलीचे वडील अशा चारजणांना अटक केलीय. त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही मुलगी अल्पवयीन आहे, हे मला माहित नव्हतं, असा पवित्रा आता लग्न लावणा-या भटजीनं घेतलाय. तर झाल्या प्रकाराबाबत नवरदेवासह मुलीच्या आणि मुलाच्या वडिलांनी पश्चात्ताप व्यक्त केलाय. दरम्यान, शिक्षिका होऊन, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, अशी इच्छा त्या मुलीनं बोलून दाखवलीय. बालविवाहासारख्या अनिष्ठ प्रथांना आळा घालण्याची गरजही तिनं व्यक्त केलीय.

या मुलीला आता सुधारगृहात पाठवण्यात येणार असून, तिचं शिक्षणही पुढं सुरूच राहणार आहे. तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती बचावली. पण अशा अनिष्ठ प्रथा सुरू असणं, हा महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला कलंक नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.