वसर्ई : गणेशोत्सवादरम्यान बिभत्सपणे नाचणाऱ्या आणि मुलींवर पैसे उधळणाऱ्या गणेश मंडळावर अखेर पोलिसांनी कारवाई केलीय. सर्वात प्रथम 'झी २४ तास'नं ही बातमी दाखवली होती.
'झी २४ तास'च्या बातमीची दखल घेत वसईच्या माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल केलाय. वसई पश्चिमेकडील अंबाडी रोडवर 'फेरीवाला संघ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळा'नं काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावेळी, स्टेजवर अत्यंत बिभत्सपणे हावभाव करत एक मुलगी स्टेजवर नाचत होती तर मंडळाचे तिच्यावर पैसे उडवत तिच्याभोवती धिंगाणा घालतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं होतं.
नियमांचं उल्लंघन करत रात्री 10 नंतरही हा धांगडधिंगा लोकांची झोप उडवत सुरूच होता. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम जिथं सुरू होता तिथून अवघ्या २०० मीटर अंतरावर अंबाडी पोलीस चौकी आणि दुसऱ्या बाजूला २०० मीटरवर माणिकपूर पोलीस स्टेशन आहे.
'झी २४ तास'नं हे वृत्त दाखवल्यानंतर अखेर आज दुपारी मंडळाचे चार सभासद, लाऊडस्पीकर वाजवणारा संजय मिश्रा, नाचणाऱ्या २ मुली आणि पैसे उडवणारे चार लोक अशा 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सर्वांवर सार्वजनिक ठिकाणी बिभित्स वर्तन केल्याप्रकरणी कलम 294 प्रमाणे आणि मुंबई पोलीस कायदा 33 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय... लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल, असं माणिकपूर पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी म्हटलंय.
तर दुसरीकडे शिवसेनेने या गोष्टीचा निषेध केला असून या मंडळावर कठोर कारवाई करून मंडळाची मान्यता रद्द करण्याची मागणी केलीय. या मंडळांवर कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचंही सेनेनं म्हटलंय.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.