कोयनेतील विद्युत निर्मिती पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता

यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्यानं खाली येते आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 8, 2017, 09:22 AM IST
कोयनेतील विद्युत निर्मिती पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता title=

सातारा : यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्यानं खाली येते आहे. धरणातला विद्युत निर्मितीसाठीचा साठा इतका खाली आलाय, की येत्या दोन दिवसात जलविद्यूत निर्मिती थांबवावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे राज्यात लोडशेडिंगचं संकट आणखी तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

१०५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात सध्या २४.३१ टीएमसी पाणी साठा आहे. त्यापैकी केवळ २१.८८ टीएमसी पाणी साठा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वर्षाच्या सुरूवातीला 67.50 टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी राखून ठेवण्यात आला होता. आतापर्यंत त्यापैकी 66.83 टीएमसी पाणी वापरून झालंय. त्यामुळे केवळ 0.67 टीएमसी इतकाचं पाणी उपलब्ध आहे. 

जलसंपदा विभागानं कायद्यानुसार जर वीज कंपनीला ज्यादाचं पाणी देण्यास नकार दिला, तर  जलविद्युत प्रकल्प बंद करावा लागण्यीच भीती आहे. दरम्यान या पाण्यावरून आता राजकारणही सुरू झालंय. राज्याला पाण्याची गरज असताना कर्नाटकला अडीच टीएमसी पाणी का दिलं असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी उपस्थित केलाय.