'पुस्तकांच्या गावाला' जाऊया!

स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावाची एक नवी ओळख निर्माण होतेय... 'पुस्तकांचं गाव' म्हणून आता हे गाव ओळखलं जाणार आहे. आज (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांचया हस्ते या प्रकल्पाचं उदघाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भिलार गाव सजलंय. 

Updated: May 4, 2017, 10:46 AM IST
'पुस्तकांच्या गावाला' जाऊया! title=

विकास भोसले, झी मीडिया, सातारा : स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावाची एक नवी ओळख निर्माण होतेय... 'पुस्तकांचं गाव' म्हणून आता हे गाव ओळखलं जाणार आहे. आज (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांचया हस्ते या प्रकल्पाचं उदघाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भिलार गाव सजलंय. 

भिलार... निसर्गरम्य महाबळेश्वरमधलं गाव... स्ट्रॉबेरीचं गाव अशी त्याची ओळख... पण आता हेच गाव पुस्तकांचं गाव म्हणूनही ओळखलं जाणार आहे. 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' अशीच भावना इथल्या प्रत्येक ग्रामस्थांची आहे. प्रकल्पात 25 घरं सहभागी झालीय. त्या प्रत्येक ठिकाणाचं असं सुसज्ज आणि सुंदर ग्रंथालयात रुपांतर करण्यात आलंय. इथं कथा, कविता, कादंबरी, संत साहित्य, स्त्री साहित्य, बालसाहित्य, इतिहास, निसर्ग, पर्यावरण, पर्यटन, लोकसाहित्य, चरित्र-आत्मचरित्र अशी एक ना अनेक पुस्तकं वाचण्याची संधी मिळणार आहे.

एका घरात जवळपास चारशे ते पाचशे पुस्तकं अशी एकूण 15 हजार पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख  साहित्यिक, लोकअभ्यासक यांची माहिती देणाऱ्या 50 साहित्यिक प्रदर्शनीही इथं असणार आहे. 

पर्यटक किंवा रसिक वाचक घरांमध्ये जाऊन निवांत वाचन करू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आलीय. भिलार वासियांनी राज्य शासनाच्या पुढाकाराला सकारात्मक आणि उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यानं निसर्गरम्य गावात स्वत्व या स्वयंसेवी गटाच्या जवळपास 75 चित्रकारांनी पुस्तकं असलेलं प्रत्येक ठिकाण सजवलंय. 

हे 'ऑन वाय ब्रिटन'मधील वेल्स प्रांतातील गावावरुन या पुस्तकाच्या गावाची कल्पना राज्य सरकारला सुचलीय... अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच प्रकल्प असल्यानं महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावणार असून सातारा जिल्ह्यासाठीही ही गौरवास्पद बाब आहे.