घर घेतांना सावधान... विरारमध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक

घर घेताना सावधान... विरारमध्ये जे. पी. नगरच्या एका भूखंडावर एका प्रकल्पात घर घेतलेल्या ग्राहकांवर आता पोलीस ठाण्यात खेटे मारण्याची वेळ आलीय. या प्रकल्पात घर बुक केलेल्या अनेक लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केलीय. 

Updated: Aug 25, 2015, 11:29 PM IST
घर घेतांना सावधान... विरारमध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक title=

विरार: घर घेताना सावधान... विरारमध्ये जे. पी. नगरच्या एका भूखंडावर एका प्रकल्पात घर घेतलेल्या ग्राहकांवर आता पोलीस ठाण्यात खेटे मारण्याची वेळ आलीय. या प्रकल्पात घर बुक केलेल्या अनेक लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केलीय. 

अनेक लोकांनी आईनिक इकोसिटी या बिल्डरकडे लाखो रुपये भरून घर बुक केलं. दोन लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत पैसे भरल्याची माहिती फसवणूक झालेल्या ग्राहकांनी दिलीय. आईनिक इकोसिटी या बिल्डरनं तो प्रोजेक्ट क्रिस्टल होमकॉन या दुसऱ्या बिल्डरला विकला. नव्या बिल्डरनं विरार नगरी या नावानं सुरु केलेल्या प्रकल्पात घर हवं असेल तर आणखी पैसे द्यावे लागतील असं सांगितलं. तसंच घर नको असेल तर पैसे परत देण्याची तयारी दर्शवली. काही ग्राहकांनी घर मिळेल म्हणून पैसे भरले तर काही ग्राहकांनी घर नको म्हणून पैसे परत मागितले. पण त्यांना दिलेले चेक वटलेच नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी रविवारी थेट पोलीस ठाणं गाठत तक्रार नोंदवली.  

गृहप्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी धडक मारली. तिथं विवा होम्स असा फलक पाहून लोक आणखीच संतापले.  त्यानंतर संतप्त लोक क्रिस्टल होमकॉन या बिल्डरच्या कार्यालयात पोहचले. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना घेराव घातला. गर्दी पाहून तिथल्या कर्मचाऱ्यांनाही घाम फुटला. संतप्त लोक मग या कर्मचाऱ्यांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. लोकांचा आक्रोष पाहून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. पैसे परत मिळेपर्यंत संघर्ष सुरु ठेवण्याचा निर्धार या लोकांनी केलाय.  

तर आईनिक इकोसिटी बिल्डरच्या ऑफिसमध्ये संपर्क साधूनही बिल्डर ऑफिसमध्ये नसल्याचं सांगण्यात आलं.  तर क्रिस्टल होमकॉनच्या भागीदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.  दुसरीकडे या प्रकरणी पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलायचं टाळलं. मात्र दोन्ही बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.