फुगेंचा सोन्याचा शर्ट नक्की कुणी लपवून ठेवलाय?

भोसरीतील चर्चेत आलेले गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांचा खून झाला, गोल्डमॅन दत्ता फुगे सोन्याच्या शर्टमुळे चर्चेत आले होते.

Updated: Jul 19, 2016, 02:08 PM IST
फुगेंचा सोन्याचा शर्ट नक्की कुणी लपवून ठेवलाय? title=

पिंपरी-चिंचवड : भोसरीतील चर्चेत आलेले गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांचा खून झाला, गोल्डमॅन दत्ता फुगे सोन्याच्या शर्टमुळे चर्चेत आले होते, मात्र आता तोच सोन्याचा शर्ट पुन्हा चर्चेत आला आहे, कारण गोल्डमॅन फुगे यांचा तो सोन्याचा शर्ट नेमका कुठे आहे, ते अजूनही समजायला मार्ग नाही. 

दत्तात्रय फुगे यांच्या मुलाचा दावा

हा सोन्याचा शर्ट चिंचवडच्या रांका ज्वेलर्स यांच्या ताब्यात आहे. अवाच्या सवा व्याज लावून आपल्याकडे ठेवून घेतला आहे, असा आरोप गोल्डमॅनचा मुलगा शुभम फुगे याने केला आहे.  प्राप्तिकर विभागाचा २०१३ मध्ये  छापा पडला होता आणि सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हा शर्ट रांका ज्वेलर्सकडे दिला होता. त्यानंतर, पैशाची गरज होती म्हणून काही रक्कम रांका यांच्याकडून घेतली. 

त्यांनी शर्ट परत दिला नाही? - शुभम फुगेचा आरोप

मात्र, त्याचे अवाच्या सवा व्याज लावण्यात आल्याचा दावा शुभमने केला आहे. जेवढे पैसे घेतले होते, ते परत देण्यास तयार असतानाही रांका यांना मात्र ते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शर्ट परत दिला नाही. त्यामुळे रांका यांच्याविरोधात वडिलांनी न्यायालयीन लढा सुरू केला, तो आपण पुढे चालवणार असल्याचा निर्धार शुभमने व्यक्त केला. 

सोन्याच्या शर्टाचा खर्च १ कोटी २ लाख रूपये

चिंचवड येथील रांका ज्वेलर्स यांच्याकडून फुगे यांनी साडेतीन किलो वजनाचा शर्ट तयार करून घेतला, त्यासाठी १ कोटी २ लाख रुपये खर्च आला होता. या शर्टवरून नव्याने वाद सुरू झाला आहे.

रांका ज्वेलर्सने आरोप फेटाळले

रांका ज्वेलर्सने आरोप फेटाळले आहेत, शर्ट बनवून दिल्यानंतर सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आता आमचा काहीही संबंध राहिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावर रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले, की हा स्वत:ची कातडी वाचवण्याचा प्रकार आहे. शुभम फुगे असे चुकीचे का बोलतो आहे, कळायला मार्ग नाही. 

सर्व व्यवहार धनादेशाद्वारे 

दत्तात्रय फुगे यांनी शर्ट बनवून घेतला, सर्व व्यवहार धनादेशाद्वारे झाले आहेत. आता काही संबंध राहिलेला नाही. २०१३ नंतर तो शर्ट आमच्याकडे दिल्याचे तो मुलगा सांगत आहे. मात्र, त्यानंतरही तो शर्ट दत्तात्रय फुगे यांनी अनेकदा घातला होता. त्यामुळे शुभमच्या म्हणण्याला अर्थ नसल्याचं फत्तेचंद रांका यांनी म्हटलं आहे.