पुणे : पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पीआयबी म्हणजेच केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
यासाठीची बैठक आज दिल्लीत होत असून प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी महापालिकेचे अधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. पीआयबीची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाला केंद्राचा निधी मिसळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे मंत्रीमंडळाच्या औपचारिक मान्यतेनंतर मेट्रो प्रकल्प खऱ्या अर्थानं रुळावर येणार आहे.
राजकिय इच्छाशक्तीचा अभाव, एलिव्हेटेड की अंडरग्राऊंड याबाबतचा वाद, स्वयंसेवी संस्थांचे आक्षेप अशा अनेक कारणांनी पुण्याची मेट्रो गेली सात वर्षे रखडली आहे. यापूर्वी प्रकल्प आराखड्यातील त्रुटींवर बोट ठेवत पीआयबीने प्रस्ताव परत पाठवला होता. त्यावरून चांगलेच राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले होते. या पार्श्वभूमीवर मेट्रोचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत पुन्हा एकदा केंद्राकडे पाठवण्यात आलाय. त्यावरील महत्वपूर्व निर्णय आज अपेक्षित आहे.
प्रकल्पाच्या मान्यतेचा अंतीम टप्पा पार करताच येत्या महापालिका निवडणूकीपूर्वी म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी मेट्रोचं भूमिपूजन शक्य आहे. किंबहुना भाजप सरकारचा तोच मनसुबा असल्याची चर्चा आहे.