महेश पोतदार, उस्मानाबाद : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. पण उस्मानाबादमध्ये २१ सावकारांच्या टोळीनं मिळून एका महिला शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं.
वनमाला गायकवाड या उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील भाट शिरपुरा गावातली महिला शेतकरी... सावकारांच्या जाचाला कंटाळून तिनं राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. 'झी मीडिया'नं या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आलंय.
गिधाडासारखं टपून बसलेल्या २१ सावकारांच्या टोळीनं दोन वर्षांत एक एक करत तिची २६ एकर सुपीक शेतजमीन हडप केल्याचा आरोप केला जातोय. या जमिनीची बाजारभावानं किंमत आहे तब्बल ३ कोटी रूपये...
मयत वनमाला गायकवाड हिच्या पतीचं २००५ मध्ये निधन झालं. त्यांना स्वप्नील, सुमित, अश्विनी आणि प्रतिभा अशी चार मुलं... मागील निवडणुकीत त्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या. त्यांचा अशिक्षित मोठा मुलगा स्वप्नील हाच घर आणि शेताचा कारभार पाहायचा. या सावकारी प्रकरणाची सुरुवात १२ जानेवारी २०१५ ला झाली. शेताच्या कामासाठी स्वप्नीलनं कळंब येथील सावकार प्रवीण देशमाने यांच्याकडून दीड लाख रुपयांचं कर्ज तीन टक्के व्याजानं घेतलं. या कर्जासाठी त्याने कुटुंबाच्या नावावर असलेली दोन एकर जमीन रजिस्ट्री करून दिली. पण काही महिन्यातच व्याज दिलं नाही म्हणून त्याला मारहाण करून धमक्या देण्यात आल्या.
व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी या प्रवीण देशमाने नावाच्या सावकारानं आपला मावसभाऊ संतोष सोनवणे या दुसऱ्या सावकाराकडून दीड लाख रुपयांचं कर्ज घेण्यास भाग पाडलं. त्यापोटी त्याची तीन एकर जमीन स्वतःच्या नावावर रजिस्ट्री करून घेतली. या दुसऱ्या दीड लाखाच्या कर्जाच्या व्याजासाठी पुन्हा स्वप्नीलला मारहाण सुरु झाली.
आधीच्या सावकाराचं कर्जाचं व्याज फेडण्यासाठी पुन्हा दुसरा सावकार स्वप्नीलसमोर उभा करायचा आणि त्याची शेतजमीन रजिस्ट्री करवून घ्यायची...
ही मोडस ऑपरेंडी वापरत प्रवीण देशमाने, संतोष सोनवणे, बळीराम जाधव, उषा होऊसलंमल, उत्तम कुंभार, मिन्हाज शेख, सत्तार शेख, शाम थोरात, समीर मिर्झा, उमान मिर्झा, आरिफ मिर्झा, शेख जलील, विजय खोसे, रंगनाथ वाघमारे, सादिक पठाण, जावेद नुरानी, हाऊसमल बबन, वसीम शेख, शरद सूर्यवंशी, अनंत वाघमारे आणि शंकर वाघमारे या २१ सावकारांच्या टोळीनं त्यांची शेतजमीन लुटली. गायकवाड कुटुंबियांनी १४ लाख ७५ हजार रूपयांचं सावकारी कर्ज घेतलं. पण त्यापोटी या सावकारांनी तब्बल ३ कोटी रूपयांची शेतजमीन हडप केली, असा आरोप गायकवाड कुटुंबियांनी केलाय.
या प्रकरणात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एकाला अटक करण्यात आलीय, अशी माहिती डीवायएसपी नितीन काटकर यांनी दिलीय.
शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेत सावकारांची टोळीच शेतकऱ्यांना कसं देशोधडीला लावतेय, याचं हे जिवंत उदाहरण... शिवसेनेकडून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याला जर आत्महत्या करावी लागत असेल, तर या सावकारी टोळीची किती दहशत आहे, याची कल्पनाच न केलेली बरी...