'आयएसओ' सर्टीफिकेट मिळवणारी कोकणातली पहिली शाळा!

आवडते मज मनापासूनी शाळा असे तोंडसुरे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आता म्हणू लागले आहेत. स्वच्छ, सुंदर आणि संस्कारांचे बाळकडू पाजणाऱ्या शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळालंय. आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारी ही कोकणातील पहिली शाळा ठरली आहे.

Updated: Jan 22, 2015, 02:30 PM IST
'आयएसओ' सर्टीफिकेट मिळवणारी कोकणातली पहिली शाळा! title=

रायगड : आवडते मज मनापासूनी शाळा असे तोंडसुरे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आता म्हणू लागले आहेत. स्वच्छ, सुंदर आणि संस्कारांचे बाळकडू पाजणाऱ्या शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळालंय. आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारी ही कोकणातील पहिली शाळा ठरली आहे.

रायगड जिल्ह्यातील दुर्गम अशा डोंगराळ म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे येथील ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की अलीकडे ग्रामीण भागातील पालकही नाकं मुरडायला लागलीत. पण तोंडसुरे येथील शाळेच्या शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकलाय.

शैक्षणिक गुणवत्ता राखतानाच विविध स्पर्धांमध्येही या शाळेचे विद्यार्थी चमकताहेत. बाह्यरूपाबरोबरच अंतरंग बदलण्यावर शाळेने भर दिला आहे.

परसबाग, ध्यानधारणा कक्ष, छोटं पण नेटकं मैदान, गांडूळ खताचा प्रयोग, रूम टू रीड संस्थेने पुरवलेला पुस्तकांचा खजिना, संगणक कक्ष, पालकांसाठी व शिक्षकांसाठी असलेल्या वेगवेगळ्या तक्रार पेट्या, सुंदर व देखणे कारंजे, विद्यार्थ्यांसाठी झोपाळे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह अशा विविध वैशिष्ट्यांमुळे शाळेचे नाव 'आयएसओ'मध्ये नोंदले गेले आहे. आता या जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांनी गावात तंबाखू मुक्तीची मोहीम हाती घेतली आहे. 

भौतिक सुविधा नसल्याने शाळेची प्रगती खुंटली होती. पण, ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला आणि एरव्ही राजकारणात एकमेकांविरूद्ध लढणारे राजकारणीही शाळेसाठी एकत्र आले. या शाळेला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 'आयएसओ' प्रमाणपत्राच्या रूपाने केवळ शाळेच्याच नव्हे तर रायगड जिल्ह्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मेहनत करण्याची तयारी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर शाळेच्या शिक्षकांनी हे अशक्यप्राय आव्हान पेलून दाखवलं. आता जिल्ह्यातील इतर शाळांनीही तोंडसुरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा आदर्श ठेवत, विद्यादानाच्या कामात अधिक मेहनत घेणं आवश्यक आहे. जेणेकरून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास वेळ लागणार नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.