www.24taas.com, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाच्या आमदारांमध्ये असलेली नाराजी पुन्हा एकदा समोर आलीय. कालच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्ष अशोक चव्हाणांना एकटं पाडत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. मात्र, यानिमित्तानं अनेक काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना लक्ष करत काँग्रेस राष्ट्रवादीसारखं आपल्या मंत्र्यांच्या पाठिशी उभं राहत नसल्याचा आरोप केलाय.
पक्षात अशीच परिस्थिती राहिली तर आगामी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ४० जागा निवडून येणंही अवघड असल्याचा इशारा काँग्रेसच्याच आमदारांनी दिलाय. स्वपक्षीय आमदारांनीच अशी भूमिका घेतल्यानं मुख्यमंत्र्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. कामे होत नसल्याची तक्रार किती वेळा करायची? असा सवालही या बैठकीत काँग्रेस आमदारांनी केला. काँग्रेसच्या मंत्र्यांकडे कामे घेऊन गेल्यावर फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. याबात तक्रार करूनही मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत, असा सूरही आमदारांनी काढला. मुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत जागून कामे करतात, पण त्याचा पक्षाला किती फायदा होतो, अशी वैयक्तिक टीकाटिप्पणी मुख्यमंत्र्यांना उद्देशून काही आमदारांनी केली.