झी २४ तास वेब टीम, मुंबई
पेण अर्बन बँकेच्या संतप्त ठेवीदारांनी आपल्या मागण्यांसाठी आज मोर्चा काढला. मात्र, हा संघर्ष मोर्चा मुंबईतील चेंबूर येथे पोलिसांनी रोखला.
आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह ४०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ठेवीदारांनी पेण येथून सुरुवात केलेली पेण ते वर्षा संघर्ष मोर्चा मंगळवारी मुंबईत पोहोचली. वाशी येथून चेंबूर येथे ती दाखल झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी संघर्ष मोर्चा धडकणार होता
मुंबईत प्रवेश करताना आंदोलकांच्या डोक्यावर जगप्रसिद्ध पेणच्या श्री गणेशाच्या मूर्ती विराजमान होत्या. या मूर्ती आंदोलक डोक्यावर घेऊन येत असताना रस्त्यावरील प्रवासी या गणेशमूर्तींकडे कुतूहलाने पाहत होते. नवी मुंबई व ठाणे परिसरातील ठेवीदार खारघर ते वाशी दरम्यान संघर्ष मोर्चात सहभागी झाले होते.
पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या पेण ते वर्षा संघर्ष मोर्चाला गेल्या दोन दिवसांपूर्वी पेणमधील पेण अर्बन बँकेच्या कार्यालायासमोरून प्रारंभ झाला. आमची बँक वाचवा, पैसे परत करा, या मागणीसाठी ही संघर्ष मोर्चा सुरू आहे.