www.24taas.com, मुंबई
राज्याचे बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र, या आरोपात तथ्य नसल्याचे सांगून किरीट सोमय्या यांचे आरोप भुजबळ आणि तटकरे यांनी फेटाळले होते. त्यानंतर सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत ढीगभर पुरावे सादर केले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेकडे २६०० पानांचे कागदपत्रे असलेला तक्रार अर्ज मंगळवारी दाखल केला. सोमय्या आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दोन मंत्र्यांच्या विरोधात पोलीस स्वत:हून कारवाई करणार नाहीत, याची खात्री असल्यानेच आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे दिले असून आता तरी पोलिसांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
15ऑगस्टपर्यंत कारवाई झाली नाही तर जनहित याचिका दाखल करू. हिंमत असेल तर भुजबळ यांनी आपल्या विरोधात खटला भरून दाखवावा, असे आव्हान सोमय्या यांनी दिले आहे. त्यामुळे भुजबळ आणि तटकरे आता काय प्रतिउत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.