www.24taas.com, मुंबई
म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बाबींचा फटका बसल्याने मुंबईकरांचे स्वस्त घराचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा जाहीर होऊनही लॉटरीची जाहिरात निघू शकलेली नाही. तांत्रिक घोळ संपून येत्या आठवड्यात जाहिरात काढण्याचे म्हाडाने सांगितले आहे.
मुंबई आणि मिरा रोडमधील सुमारे अडीच हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघत आहे. एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात जाहिरात निघून मेअखेरीस सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. मात्र लॉटरीच्या तांत्रिक कामाचा आवाका मोठा असल्याने कमी मनुष्यबळामुळे 'स्टेट डाटा सेंटर'ने (एसडीसी)लॉटरीतून अंग काढून घेतले. त्यामुळे म्हाडाला जाहिरातीच्या तारखा पुढे ढकलाव्या लागत आहे.
'एसडीसी' चे काम आता 'सिफी' ही संस्था करणार असून यापूर्वीच्या लॉटरीचे काम संस्थेने केले आहे. राज्य सरकारच्या 'महाऑनलाइन'च्या मदतीने निघणाऱ्या या लॉटरीचे मुख्य तांत्रिक काम 'मास्टेक' ही सॉफ्टवेअर कंपनी पाहणार आहे. लॉटरीसाठी खास परदेशातून 'सर्व्हर' मागवण्यात आला असून त्याच्या तांत्रिक जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.