www.24taas.com, मुंबई
आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागल्यानंतर, अडचणीत आलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज राहुल गांधींसोबत होते. माटुंग्यांच्या कार्यक्रमात तर थेट राहुल यांच्या व्यासपीठावरच राज्यातल्या इतर मात्तबर नेत्यांसोबत अशोकरावांची उपस्थिती होती.
आदर्श सोसायटी घोटाळ्याबाबतच्या अंतरिम चौकशी अहवालात अशोक चव्हाणांना क्लीन चिट मिळाली. त्यामुळे आता त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतय. आज त्यांची राहुल गांधींसोबतची उपस्थिती बरचं काही सांगून जाणारी आहे. थोडक्यात अशोक चव्हाणांचा विजनवास संपणार अशी चिन्हं दिसू लागली येत.
महाराष्ट्रात २००९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकामध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला यश आले होते. त्यामुळे काँग्रेसच्या युवराजांनी दुसऱ्यांदा अशोक चव्हाण यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. परंतु, आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांचे नाव आल्यानंतर नोव्हेंबर २०११मध्ये त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून अशोक चव्हाण कुठल्याही काँग्रेसच्या मोठ्या कार्यक्रमात आले नाहीत. परंतु, गेल्या चार महिन्यात झालेल्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांना व्यासपीठावर स्थान दिल्याने अशोक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्या एआयसीसी या काँग्रेसच्या समितीत मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे. तेव्हा काँग्रेसच्या एआयसीसीमध्ये अशोक चव्हाण यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.