झी 24 तास वेब टीम, मुबंई
शिवसेनेला शिवतिर्थावर 6 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवारी) सशर्त परवानगी दिली. त्यासाठी ध्वनिक्षेपकाची मर्यादा 50 डेसिबल्स ठेऊनच शिवसेनेला सभा घ्यावी लागणार आहे.
शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येत असल्यामुळे येथे जाहीर सभा घेण्यास मुंबई महापालिका मनाई केलीहोती. त्यामुळे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयात याचिका केली होती. मुख्य न्या. मोहित शहा व न्या. रोशन दळवी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.
[caption id="attachment_1231" align="alignleft" width="500" caption="शिवसेनेच्या वाघाची डरकाळी ५० डेसिबल्सची"][/caption]
आवाजाची निर्धारित मर्यादा पाळणे, शिवाजी पार्कच्या बाहेर आवाज जाऊ न देणे, कार्यक्रम 10 वाजता संपवून मैदान पूर्ववत करणे आदी शर्ती खंडपीठाने जाहीर सभेसाठी परवानगी देताना घातल्या आहेत.
शिवसेनेने गेल्या वर्षी दसरा मेळाव्याची परवानगी घेताना ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळण्याची हमी दिली होती. प्रत्यक्षात आवाजाची मर्यादा 50 वरून 90-100 डेसिबल्सपर्यंत गेली होती. पोलिसांनी याबाबत शिवसेनेविरोधात फिर्यादही नोंदविली. त्यामुळे यंदा मेळाव्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी मूळ याचिकादार संस्था वेकॉम ट्रस्टच्या वतीने ऍड. विराज तुळजापूरकर यांनी केली होती.
पालिकेने शिवसेनेच्या अर्जाला मेमध्येच मनाई केली होती; परंतु सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे परवानगी द्यायला हवी, असे मत पालिकेचे वकील के. के. सिंघवी यांनी व्यक्त केले. खंडपीठाने मेळाव्यासाठी परवानगी देण्याचा आदेश महापालिकेला दिला. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी 5 ते 10 या वेळेत मेळावा होणार आहे.