www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणुक आयुक्त निला सत्यनारायण यांनी तसे संकेत दिलेत. निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
मतमोजणी यंत्रे पुरेशी उपलब्ध झाल्यास एकाच दिवशी मतमोजणी शक्य असल्याचं निला सत्यनारायण यांनी म्हटलं होतं. राज्य निवडणूक आयोगाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकार आणि हैदराबाद येथील संस्थेकडून एक लाख ३० हजार मतदान यंत्रे उपलब्ध झाली आहेत. या यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यावर एकाचवेळी मतमोजणी घेण्यास आयोग सज्ज झाल्याचे संकेत मिळतायेत. यासंदर्भातील घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
सात फेब्रुवारीला जिल्हा परीषद आणि पंचायत समितीसाठी मतदान झाल्यानंतर ८ तारखेला मतमोजणी करुन निकाल जाहीर करण्याची निर्णय याआधी झालाय. मात्र या निकालाचे १६ फेब्रुवारीला होणा-या दहा महापालिकांच्या निवडणुकांवर प्रभाव पडेल, असा मुद्दा पुढे करत शिवसेना, भाजप आणि मनसेने एकाचवेळी मतमोजणी घेण्याची मागणी केली आहे.