मुंबई : चेंबूरमधील एका अवघ्या 12 वर्षांच्या मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय. गेल्या सोमवारी जे जे हॉस्पीटलमध्ये आपल्या बाळाला जन्म देणाऱ्या या मुलीनं आपल्यावर आपल्या सावत्र वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलंय. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
जे जे हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आईच्या पोटी जन्मलेल्या या अर्भकाचं वजन 2 किलो आहे. जन्मानंतर त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार ही मुलगी वारंवार करत होती. पण, एवढी छोटी मुलगी गर्भवती असू शकते, असा विचारही डॉक्टर करू शकत नव्हते. त्यामुळे, त्यांनी सुरुवातीला तिला वेदनाशामक गोळ्या दिल्या. पण, तिचं पोट वाढायला सुरुवात झाल्यानंतर डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली. यानंतर ती सात महिन्यांपेक्षा जास्त दिवसांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं.
त्यानंतर तिच्या आईनं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबानंतर तिच्या सावत्र बापाला अटक केली. त्यानंतर पीडित मुलीला डोंगरीच्या एका शेल्टरमध्ये शिफ्ट करण्यात आलं.
उल्लेखनीय म्हणजे, ही मुलगी देशातील सर्वात लहान वयातच अपत्याला जन्म देणारी मुलगी ठरू शकते. पीडित मुलगी अजून इतकी लहान आहे की तिच्या बाळाला योग्य पद्धतीनं उचलूनही घेऊ शकत नाही, असं डॉक्टरांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.