www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना, देशातील वृध्दांची स्थितीही फारशी चांगली नाही, हेच वास्तव `हेल्पेज इंडिया`च्या सर्वेमध्ये पुढे आलंय. वृध्दांवरील अत्याचारांचं गेल्यावर्षीचं २३ टक्क्यांवर असलेलं प्रमाण 2014 मध्ये ५० टक्क्यांपर्यंत म्हणजे दुपटीहून अधिक वाढलंय. विशेष म्हणजे वृद्धांवर अत्याचार करण्यात घरच्या सूनबाईंचा वाटा मोठा असल्याचंही सिद्ध झालंय.
महिलांप्रमाणेच देशातील ज्येष्ठ नागरिकही आता सुरक्षित नाहियेत आणि तेही घरच्यांच्या छळवणुकीमुळे. हेल्पेज इंडिया नावाच्या संस्थेनं देशातील 12 शहरांमध्ये केलेल्या सर्वेमध्ये हे वास्तव समोर आलंय.
देशात वृद्धांवरील अत्याचारात यंदाच्या वर्षी दुपटीहून अधिक वाढ झालीय. गेल्यावर्षी हे प्रमाण 2013 मध्ये 23 टक्के होतं. ते 2014 मध्ये 50 टक्क्यांवर पोहोचलंय. वृद्धांवरील अत्याचारात मेट्रो सिटीजमध्ये चेन्नई आघाडीवर आहे. २०१३ मध्ये ९ टक्के वृद्धांवर अत्याचार झाले होते ते प्रमाण यावर्षी ५३ टक्के इतकं झालंय. कोलकत्यात २७ टक्क्यांवरून ६० टक्के झालंय, दिल्लीत २० टक्क्यांवरून २२ टक्के, तर मुंबईत वृद्धांवर अत्याचाराचं प्रमाण ११ टक्क्यावरून ३८ टक्के इतकं वाढलंय.
हे प्रमाण लहान शहरांमध्येही वाढत चाललयं. यामध्ये गुवाहाटी सारख्या शहरात पूर्वी वृद्धांवर अत्याचाराचं प्रमाण 0 टक्के होते ते 2014 मध्ये 34 टक्के इतकं झालंय. विशेष म्हणजे वृध्दांवर अत्याचार करण्यात घरची लक्ष्मी समजली जाणाऱ्या सूना आघाडीवर असल्याचं समोर आलंय.
सर्वेतील आकडीवारीनुसार वद्धांवर अत्याचार करण्यामध्ये ६१ टक्के सुना पुढे असतात, तर मुलांचं प्रमाण ५९ टक्के आहे, तर केवळ ६ टक्के जावई घरातील वृद्धांवर अत्याचार करतात.
प्रत्येक दोन वृध्दांमागे एका वृद्धाला घरगुती अत्याचाराला सामोरं जावं लागतंय, हा अत्याचार घरातील शाब्दिक चकमकी, अनादर करणे, दुर्लक्ष करणं, आर्थिकदृष्टया पिळवणूक करणं अशा माध्यमातून होत असल्याचं पुढे आलंय आणि अशा छळाबाबत कौटुंबिक गोष्टींची वाच्यता नको म्हणून पोलिसांत तक्रार करायला ही वृद्धमंडळी धजावत नाहीत.
वृध्दापकाळात मुलगा-सून काळजी घेतील अशी एक साधी अपेक्षा या वृद्धांची असते, मात्र या सर्वेतून भारतीय कुंटुब व्यवस्था आणि त्यातील मूल्य कशी ढासळत चालली आहे हेच समोर येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.