www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन-तीनदा आदेश देऊनही, आघाडी सरकारमधील 42 पैकी 18 मंत्र्यांनी अजून आपली मालमत्ता जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला या मंत्र्यांनी चक्क केराची टोपली दाखवलीय. आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं किती वजन आहे, हेच यावरून स्पष्ट दिसतंय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर, केंद्रातील सर्व मंत्र्यांना पुढील दोन महिन्यात आपली मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश दिलेत. केंद्र सरकारनं मंत्र्यांसाठी लागू केलेल्या आचारसंहितेनुसार प्रत्येक मंत्र्याला स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या मालमत्तेचा तपशील दरवर्षी ३१ ऑगस्टपर्यंत सादर करावा लागतो. त्यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आतापर्यंत तीनवेळा मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश दिलेत. मात्र राज्यातील अनेक मातब्बर मंत्री मालमत्तेचा तपशील देण्यास टाळाटाळ करत असल्याचं आढळून आलंय. राज्य मंत्रिमंडळातील ४२ पैकी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केवळ २४ मंत्र्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील सादर केलाय.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या वर्षी एकाही मंत्र्यानं आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला नाही. दुसऱ्या वर्षी १६ मंत्र्यांनी, तिसऱ्या वर्षी २२ मंत्र्यांनी तर यंदा २४ मंत्र्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिलाय. मालमत्तेचा तपशील न देणाऱ्या मंत्र्यांमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री नारायण राणे, गृहमंत्री आर. आर. पाटील, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, जलसंधारण मंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल, जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री रणजित कांबळे, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे या मंत्र्यांनी अद्याप आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केलेला नाही.
आपल्या मालमत्तेचा तपशील न देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी यासंदर्भात दरवर्षी पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विशेष बाब म्हणजे 24 मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशील सादर केला असला तरी हा तपशील जनतेसाठी उपलब्ध नाही. मिस्टर क्लीन अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्र्यांच्या मालमत्तेचा तपशील राज्य शासनाच्या बेवसाईटवर टाकावा, अशी मागणी वारंवार होतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.