मुंबई : नुकताच पारा पुन्हा वाढायला लागलाय. मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी आणि उन्हामुळं त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा प्रवास गार करण्यासाठी लवकरच मुंबईत एसी लोकल धावणार आहेत. ऑक्टोबर हीटपूर्वी मुंबईत एसी लोकल धावतील, असं आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलंय.
तामिळनाडूतील पेरम्बूर आणि कोपरथाळा इथं या एसी कोचेस तयार झाल्या असून दर दोन हजार किमीच्या प्रवासानंतर या डब्यांचा मेटेनन्स करण्यात येणार आहे. मेट्रो प्रमाणेच लोकलही गारेगार होणार आहे. फक्त यंदाचा उन्हाळा मुंबईकरांना सोसावा लागणार आहे.
याशिवाय मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अभ्यास जपानच्या जायका कंपनीनं सुरू केला असल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले.
कोकण रेल्वेच्या दुहेरी करणासाठी मी पुढाकार घेतला असून कोकण रेल्वे फायद्यात नसली तरी हे दुहेरीकरण करणाचे आदेश दिल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, आज रोहा - दिघी पोर्ट रेल्वे लिंक प्रकल्प सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात हा कार्यक्रम पार पडला. रेल्वे विकास निगम लिमिटेड आणि दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.