एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, सात ठार, दोन गंभीर जखमी

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील धोंडेवाडी या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी गेलेल्या धोंडे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला

Updated: Sep 21, 2015, 07:13 PM IST
एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, सात ठार, दोन गंभीर जखमी title=

मृतांमध्ये चार महिला व दोन मुलांचा समावेश

मुंबई : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील धोंडेवाडी या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी गेलेल्या धोंडे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला. गणेशोत्सव साजरा करून मुंबईला परत येत असताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोधिवली जवळ झालेल्या भीषण अपघातात या कुटुंबातील सात जण ठार झाले.

मृतांमध्ये चार महिला  आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या या दोघांवर नवी मुंबईतील एम. जी. एम. रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

धोंडे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असलेल्या धोंडेवाडी येथील रहिवाशी आहेत. कामासाठी हे कुटुंब नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे स्थायिक झाले होते गणेशोत्सवासाठी सर्वजण गावाला गेले होते. गावावरून एम.एच. 04 ए.वाय. 1850 या क्रमांकाच्या क्वॉलिसने नवी मुंबईत येत असताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोधिवली गावाजवळ सोमवारी दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान भरधाव वेगात असलेल्या क्वॉलिसचा टायर फुटल्याने क्वॉलिस पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर जावून एम.एच. 04 एफ. 3258 या डंपरवर जावून आदळली आणि सात जणांचा मृत्यू झाला. 

या भीषण अपघातात धर्मराज धोंडे (वय 45), वेदांत धर्मराज धोंडे (वय 10), सुनिता धोंडे (वय 40), अश्‍विनी धोंडे (वय 15), शुभम पवार (वय 7), सखुबाई पवार (वय 40), व चित्रा धोंडे (वय 40) यांचा मृत्यु झाला तर प्रतिक धोंडे (वय 16) व पुजा धोंडे (वय 15) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नवी मुंबईतील एम.जी.एम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गणपतीसाठी हे कुटुंब गावाला गेले होते. काही अंतरावर घर असतानाच त्यांचा अपघातात मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.  

गुरूनाथ साठेलकर यांनी काढले मृतदेह
अपघात झाल्यानंतर पोलीस व आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. मात्र अपघातानंतर मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यास कुणीही धजावत नव्हते. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी दाखल झालेले पत्रकार व अपघातग्रस्तांना नेहमी मदत करणारे गुरूनाथ साठेलकर यांनी गाडीतील छिन्नविचिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाजुला करण्यात आली. पोलीस यावेळी बघ्याची भूमिका घेत असल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक सचिन काशिद यांनी अशा घटनेच्या वेळी नेहमी पुढाकार घेवून मदत करणार्‍या पत्रकारांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.