अजितदादा गप्प! सुप्रिया सुळे राज्यात अचानक सक्रीय, अनेकांच्या भुवया उंचावल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात अचानक सक्रीय आणि आक्रमक झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

Updated: Oct 8, 2016, 06:19 PM IST
अजितदादा गप्प! सुप्रिया सुळे राज्यात अचानक सक्रीय, अनेकांच्या भुवया उंचावल्या title=

दीपक भातुसे / मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात अचानक सक्रीय आणि आक्रमक झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि मराठा आरक्षणावरून त्यांनी आक्रमकपणे थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष केलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे राज्यातील नेते अजित पवार मात्र शांत असून त्यांच्या काही वक्तव्याने पक्षाचीच अडचण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने राज्याची सूत्रे सुप्रियाताईंकडे सोपवली की काय, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राज्यातील पक्षाची सर्व सूत्रे अजित पवार यांच्या हातात आहेत. मात्र सुप्रिया सुळे यांचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर अजितदादांचे पक्षातील महत्त्व कमी होऊन शरद पवारांची कन्या म्हणून सुप्रियाताईंचे महत्त्व वाढेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. अजित दादा आणि सुप्रियाताई या भावा-बहिणीत राजकीय संघर्षाच्या कथाही राज्याच्या राजकारणात अनेकदा चवीने रंगवल्या गेल्या. मात्र या दोघांनीही वेळीवेळी त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.

अजितदादा राज्याच्या राजकारणात आणि सुप्रिया ताई दिल्लीच्या राजकारणात अशी वाटणी झाल्याचेही अनेकदा सांगितले गेले. तसा अजितदादांना दिल्लीच्या राजकारणात जराही रस नाही, त्यामुळे ते राज्याच्या राजकारणातच रमले. सुप्रियाताई मात्र दिल्लीच्या राजकारणात असूनही सध्या राज्याच्या राजकारणात जास्त लक्ष देताना दिसत आहेत. खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंचा राज्याच्या राजकारणात जम बसवण्यासाठी स्वतः शरद पवारांनी २०१० साली युवती राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून सुप्रिया सुळेंकडे त्याची संपूर्ण जबाबदारी दिली. 

मात्र मागील सहा वर्षात सुप्रियाताईंनी युवती राष्ट्रवादीच्या माध्यमातून काही कार्यक्रम घेण्यापलिकडे राज्याच्या राजकारणात रस दाखवला नव्हता. आता मात्र मागील काही महिन्यांपासून सुप्रिया ताई राज्याच्या राजकारणात सक्रीय आणि भलत्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच आक्रमक टीका करायला सुरुवात केली आहे. 

दुसरीकडे अजितदादा मात्र सध्या शांत आहेत. मराठा आरक्षणावरून अजितदादांनी केलेल्या विधानामुळे उलट पक्षाची अडचणच वाढली आहे. अजितदादांनी कुठल्याही विषयात सरकारवर अथवा मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर सिंचन घोटाळा काढून सत्ताधारी त्यांच्यावर पलटवार करतात. त्यामुळेच पक्षानेच कोणतेही आऱोप नसलेल्या सुप्रिया ताईंना राज्यात आक्रमक होण्याबाबत सूचना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र ही बाब फेटाळून लावली आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीतला पराभवने खचलेल्या राष्ट्रवादीला आता सुप्रिया सुळेंचा बहुतेक आधार वाटू लागला आहे. त्यामुळे पक्षाचे राज्यातील इतर नेते शांत असताना सुप्रिया सुळे कधी नव्हे एवढ्या आक्रमक झाल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष आता सुप्रिया सुळेंच्या या आक्रमकपणाचा फायदा करून घेणार की निवडणुकीची सूत्रे अजितदादांकडे देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीत अजितदादा आक्रमक, तर सुप्रियाताई शांत म्हणून ओळखल्या जायच्या. मात्र सध्या चित्र उलटं आहे ताई आक्रमक झाल्या असून दादा काहीसे शांत झाले आहेत. पक्षानेच ही रणनिती आखली आहे की काय, अशी शंका त्यामुळे उपस्थित केली जात आहे.