मुंबई : येथील इंदू मिलच्या जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त पुन्हा चुकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबरला भूमिपूजन होणार का, याची चर्चा सुरु आहे.
राज्य सरकारने मोदी यांच्या हस्ते ४ ऑक्टोबरला भूमिपूजन होणार, असे आधी जाहीर केले होते. परंतु आता ११ ऑक्टोबरला भूमिपूजन होणार, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत राज्य सरकारकडून अद्याप काहीही सांगितलेले नाही.
इंदू मिलची जमीन आंबेडकर स्मारकासाठी देण्याची संसदेत घोषणा करण्यात आली. परंतु पुढे प्रत्यक्ष जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याबाबत चालढकल सुरू झाली. ही जमीन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) मालकीची आहे, त्यामुळे जमीन हस्तांतरणासाठी एनटीसी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, असे काँग्रेस सरकारने सांगितले होते. त्यानुसार तसे विधेयकही तयार करण्यात आले होते. परंतु पुढे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने ते विधेयक संसदेपर्यंत पोहचूच शकले नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आले. या सरकारने आंबेडकर स्मारकाचा विषय पुन्हा हातात घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर, इंदू मिलची जमीन हस्तांतर करण्याचा करार झाल्याचे जाहीर केले. त्यानुसार आधी १४ एप्रिल स्मारकाच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. तो मुहूर्तही टळला. त्यानंतर गेल्याच आठवडय़ात ४ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार, असे सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.