www.24taas.com, मुंबई
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली आहे, त्या कंपनीकडून मुंबईत बेकायदेशीर कमर्शियल बिल्डिंग बांधली जात असल्याचा आरोप वाय. पी. सिंह यांनी केला आहे.
वाय पी सिंग यांनी केलेल्या आरोपांनुसार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी एक्स्टसी रियल्टी या कंपनीत पैसे गुंतवले आहेत. याच कंपनीकडून अंधेरीतील ग्रीन झोन असलेल्या भागात बेकायदेशीर इमारत बांधली जात आहे. त्या जागेत बांधकामाला कायदेशीर परवान गी नाही. तेथे केवळ झाडे लावली जाऊ शकतात. अशा कंपनीत अमिताभ यांनी साडे सहा कोटी रुपये तर जया बच्चन यांनी पाच कोटी रुपये गुंतवले आहेत, असा आरोप वाय पी सिंग यांनी केला आहे.
जया बच्चन यांनी उमेदवारीचा फॉर्म भरताना या गुंतवणुकीची माहिती दिली असल्याचं वाय पी सिंग यांनी म्हटलं आहे. आपण गुंतवणूक केलेल्या कंपनीकडून असं बेकायदा बांधकाम होत असल्याची माहिती बच्चन कुटुंबीयांना कदाचित नसेलही, असा वाय पी सिंग यांचा अंदाज आहे. मात्र या प्रकरणाची तक्रार मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि संबंधित विभागांकडे करणार असल्याचा दावा वाय पी सिंग यांनी केला आहे.