मुंबई : आत्महत्या करण्यासाठी सर्रास वापर होतो, तो पंख्याचा... नॅशनल क्राइम रेकॉर्डच्या आकडेवारीत हे वास्तव समोर आलंय. त्यामुळंच आत्महत्या रोखण्यासाठी मुंबईतल्या एका अवलियानं तयार केलाय चक्क 'अॅन्टी सुसाईड पंखा'
अॅन्टी सुसाइड पंखा... आता ही काय नवी भानगड, असा प्रश्न तुम्हाला पडला ना? मुलुंडला राहणाऱ्या शरद अशानी यांनी हा पंखा तयार केलाय. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून ते सेवानिवृत्त झालेत. २००७ साली या इनोव्हेटिव्ह पंख्यासाठी अशानी यांनी पेटंटही मिळवलंय. वाढत्या आत्महत्या आणि त्यासाठी होत असलेला पंख्याचा वापर पाहता त्यांना ही कल्पना सुचली...
यात त्यांनी स्प्रिंग आणि वेगळ्या प्रकारच्या वायरींगचा वापर केलाय. १३ किलोपेक्षा अधिक वजन आल्यास हा पंखा खाली येतो. त्यातल्या स्प्रिंग आणि विशिष्ट रॉडमुळं आत्महत्या होऊ शकत नाही.
प्रत्युषा बॅनर्जी, जिया खान, मॉडेल नसीफा जोसेफ अशा सेलिब्रिटींसह अनेक विद्यार्थ्यांनी पंख्याला लटकूनच आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डच्या माहितीनुसार...
- देशात दरवर्षी १ लाख ३० हजार आत्महत्या होतात
- त्यातील ६० हजार आत्महत्या या पंख्याचा वापर करुनच होतात
- यात तरूणांची संख्या अधिक आहे
अशा परिस्थितीत अशानी यांनी तयार केलेल्या अॅन्टी सुसाईड पंख्यामुळं एक आत्महत्या जरी टळली तरी ही मेहनत सफल झाली, असं शरद अशानींना वाटतं.