मुंबई : आम्ही आमच्या सर्व आमदारांना उद्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे. पाठिंबा द्यायचा कि उद्या उपस्थित राहून मतदान करायचे, याबाबत पक्षाची भूमिका ठरेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिककडेही लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार विश्वासदर्शक ठराव सहज जिंकेल, असं दिसतंय. मात्र आयत्यावेळी राष्ट्रवादीनं वेगळी भूमिका घेतली तर मात्र सरकारला बहुमत सिद्ध करणं 'मुश्किल ही नही नामुमकीन' होऊ शकतं. अशा परिस्थितीत शिवसेना विरोधी पक्षात बसल्यास राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यातच राष्ट्रवादीने उद्यावर आपला निर्णय टाकला आहे. त्यामुळे उत्सुकता कायम आहे.
राज्याच्या राजकारणात विश्वासदर्शक ठराववरून कधी नव्हे एवढा पेच निर्माण झाला आहे. राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपा स्वबळावर सत्तेवर आला आहे. मात्र ही सत्ता टिकवणं भाजपासाठी सोपं नाही. विश्वासदर्शक ठराव जिंकला तरी अल्पमतातील सरकार पाच वर्ष चालवणे ही भाजपासाठी कसोटी ठरणार आहे.
महाराष्ट्रातल्या भाजप सरकारची उद्या अग्निपरीक्षा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. शिवसेना आणि काँग्रेसने सरकारविरोधात दंड थोपटलेत. त्यामुळं सध्या तरी भाजपची संपूर्ण भिस्त राष्ट्रवादी काँग्रेस, लहान पक्ष आणि अपक्षांवर असणार आहे.
विधानसभा निवडणुकीत 123 जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं महाराष्ट्रात प्रथमच स्वबळावर सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता क्षण आहे भाजप सरकारच्या कसोटीचा. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीसांना बुधवारी विश्वासदर्शक ठराव जिंकावा लागणार आहे. सत्तेचं गणित मांडण्यापूर्वी पाहुयात सध्या विधानसभेतलं पक्षीय बलाबल भाजप+ - 122, शिवसेना - 63, काँग्रेस - 42, राष्ट्रवादी काँग्रेस - 41, अन्य - 19 असे आहे. भाजपच्या मुखेडच्या आमदाराच्या निधनामुळं विधानसभेचं संख्याबळ सध्या 287 वर आलंय. बहुमतासाठी भाजपला 144 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजप आणि मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, सरकारला पाठिंबा जाहीर करणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार मिळून ठरावाच्या बाजूनं सध्या 134चा आकडा होतो. उरलेल्या 10 मतांसाठी भाजपला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.
शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यास किंवा बाहेरून पाठिंबा जाहीर केल्यास भाजप प्लस 122, अपक्ष आणि छोटे पक्ष 12 आणि शिवसेना 63 असं 197 संख्याबळ सरकारच्या बाजूनं असेल. मात्र शिवसेना विरोधी पक्षातच बसेल, असं सध्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्त्व वाढतं ते याच वळणावर. संपूर्ण निकाल लागण्यापूर्वीच भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर करणा-या राष्ट्रवादीच्या 41 आमदारांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केल्यास सरकारच्या बाजूनं 175 मतं होतील.
विरोधात शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42 आणि छोट्या पक्षांचे 5 आमदार होतात. त्यामुळे ठरावाच्या विरोधात 110 मतं पडतील आणि फडणवीस विश्वासदर्शक ठराव सहज जिंकतील. राष्ट्रवादी काँग्रेस मतदानावेळी अनुपस्थित राहिल्यास बहुमतासाठीची मॅजिक फिगर 124 वर येईल. त्यामुळे भाजप आणि पाठिंबा देणा-या पक्षांची 134 मतं बहुमतासाठी पुरेशी होतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.