मुंबई : शिवसेना-भाजपमधील चर्चा पुन्हा सकारात्मक दिशेनं सुरू झाल्याचं समजतंय. शिवसेनेला भाजपकडून चांगल्या प्रस्तावाची अपेक्षा असून उद्या सकाळपर्यंत शिवसेना याबाबत प्रतीक्षा करणार आहे.
यासंदर्भात शिवालयात सुरू असलेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितल्याचं समजतंय. तत्पूर्वी शिवसेनेच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. भाजपकडूनही शिवसेनेच्या नेत्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
निकोप लोकशाहीसाठी अध्यक्षपदाची निवडणूक टाळावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. निवडणूक लढणाऱ्या पक्षांशी आपण चर्चा करू असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच शिवसेनेच्या पाठिंब्याबाबतही भाजप आशावादी असल्याचं मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलंय. तर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर आनंदच होईल, असं मत केंद्रीयमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केलंय. मुनगंटीवार यांनी मात्र राष्ट्रवादी पाठिंब्याच्या बदल्यात काही अपेक्षा करत असेल तर भाजप ती पूर्ण करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
महाराष्ट्रातल्या भाजप सरकारची उद्या अग्निपरीक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या विधानसभेत बहुमताचा ठराव मांडणार असून, विश्वासदर्शक ठरावाच्या पूर्वसंध्येला सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका आयोजित करण्यात आल्यात. शिवसेनेच्या आमदारांची शिवालयमध्ये बैठक सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या बैठकीला उपस्थित आहेत.
या बैठकीत भाजपकडून चांगल्या प्रस्तावाची अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याचं समजतंय. तर दुसरीकडे भाजपच्या आमदार आणि खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला रात्री 8 वाजता होणार आहे. या बैठकीत बहुमतासाठीची रणनिती ठरवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचीही 'राष्ट्रवादी भवना'त बैठक होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.