कर्जवसुलीत गेलं मल्ल्यांचं `किंगफिशर हाऊस`!

किंगफिशर एअरलाइन्सच्या विमानांनी कायमचं लॅन्डींग केलं असताना या कंपनीकडे असलेल्या ६,०७२ कोटी रुपयांच्या थकीत कर्जवसुलीसाठी मुंबई विमानतळावर असलेलं ‘किंगफिशर हाऊस’ बँकांनी आपल्या ताब्यात घेतलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 13, 2013, 01:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
किंगफिशर एअरलाइन्सच्या विमानांनी कायमचं लॅन्डींग केलं असताना या कंपनीकडे असलेल्या ६,०७२ कोटी रुपयांच्या थकीत कर्जवसुलीसाठी मुंबई विमानतळावर असलेलं ‘किंगफिशर हाऊस’ बँकांनी आपल्या ताब्यात घेतलंय. धनको बँकांनी किंगफिशर कंपनीचं एकेकाळचं हे मुख्यालय आणि त्याच्याशी संलग्न जमीन आपल्या ताब्यात घेतलीय.
`एसबीआय कॅप्स`च्या एका ट्रस्टीने पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेल्या २५,८५० चौ. फुटांच्या भूखंडासह त्यावरील १७,०७२ चौ. फूट कार्यालयीन जागा असलेल्या इमारतीचा औपचारिक ताबा घेतला. या कारवाईची नोटीस त्या इमारतीच्या दर्शनी भागावर याआधीच चिकटविण्यात आली होती.
किंगफिशर एअरलाइन्सकडे स्टेट बँकेची सर्वाधिक म्हणजे सुमारे १,६०० कोटी रुपयांची कर्ज थकित आहेत. त्याखालोखाल पंजाब नॅशनल बँक व आयडीबीआय बँकेची प्रत्येकी ८०० कोटी रुपयांची व बँक ऑफ इंडियाची ६५० कोटी रुपयांची कर्ज किंगफिशरकडून वसूल व्हायची आहेत.

या कारवाईशी संबंधित एका बँक अधिकाऱ्याने सांगितले की, याआधी बँकांनी कंपनीचे शेअर विकून काही रक्कम वसूल केली आहे व कंपनीचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांच्या गोव्यातील बागा बीचजवळील ‘किंगफिशर व्हिला’सह कंपनीच्या इतर स्थावर मालमत्तांवरही टाच आणण्याचा विचार सुरू आहे. याखेरीज विजय मल्ल्या यांनी कर्ज घेताना कंपनीच्या व स्वत:च्यावतीने दिलेल्या बँक गॅरन्टी वटवूनही पैसे वसूल करण्याचे कर्ज देणाऱ्या बँकांचे प्रयत्न सुरू आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.